---Advertisement---
अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला जमालुद्दिन ऊर्फ छांगूर बाबाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. हे प्रकरण कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे आहे. ही संपत्ती छांगूर बाबाने पुण्यातील लोणावळा येथे खरेदी केली आणि बलरामपूर न्यायालयातील राजेश उपाध्याय या कारकुनाच्या पत्नीच्या नावावर केली. विशेष कृती दल (एसटीएफ) आणि (एटीएस) दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे.
राजस्थान, लखनौ, बलरामपूर आणि पुण्यापर्यंत पसरलेल्या या धर्मांतरण नेटवर्कचा सूत्रधार छांगूर बाबा असून, मागील कित्येक वर्षांपासून तो एक सिंडिकेट चालवत आहे. बलरामपूरमधील उतरौला येथील ‘पीर बाबा’ असल्याचे लोकांना तो भासवायचा आणि धर्मांतरणाच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळवला होता.
छांगूर बाबाने लोणावळा परिसरात जवळपास १६ कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली. या संपत्तीत त्याने साथीदार मोहम्मद अहमद खान, नवीन रोहरा उर्फ जमालुद्दिन आणि बलरमपूर न्यायालयातील कारकून राजेश उपाध्यायची पत्नी संगीतादेवीला भागीदार बनवले होते.
मदतीच्या मोबदल्यात छांगूर बाबाकडून जमीन
छांगूर बाबाच्या विरोधात तक्रार करणाऱ्याला कचाट्यात अडकवले जायचे. त्याच्या विरोधात विविध गुन्हे दाखल केले जायचे. हा सर्व खेळ न्यायालयातील कारकून राजेश उपाध्याय खेळायचा. छांगूर बाबाच्या विरोधात उचलला जाणारा प्रत्येक आवाज तो दाबायचा. मोबदल्यात त्याच्या पत्नीच्या नावावर लोणावळ्यातील कोट्यवधींची संपत्ती करण्यात आली होती.