---Advertisement---
---Advertisement---
तालुक्यातील वांजोळा येथील २७वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. नातेवाईकांनी मात्र खुनाचा संशय व्यक्त केला आहे. व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. दीपाली चेतन तायडे असे मयत महिलेचे नाव आहे.
ही महिला घराजवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून जमिनीवर पडली होती. त्यावेळी तिला भुसावळ येथील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉ. साहू यांनी दीपालीला मृत घोषित केले. त्यानंतर हॉस्पिटलमधून ट्रॉमा केअर सेंटर येथे शव विच्छेदनासाठी खाना करण्यात आले.
याठिकाणी नातेवाईक आल्यानंतर दीपालीच्या आई-वडिलांनी तिचा मारहाण करून खून झाल्याचा संशय करत दीपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, उपनिरीक्षक पूजा अंधारे व पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, संदीप बडगे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत केले. मयताचे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
तेव्हा नातेवाईकांनी शववाहिका वांजोळे येथे न नेता भादली येथे नेण्याचा आग्रह धरल्याने मृतदेह पंचनामा होऊनसुद्धा दोन ते अडीच तास ट्रॉमा केअर सेंटर पडून होता. अखेर मृतदेह भादली येथेच नेण्यात आला. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मंडळी व पोलीस पाटील संतोष कोळी उपसरपंच देविदास सावळे, सरपंच पती गोपाळ पाटील यांच्यासह यांनी सहकार्य केले. दिपाली हिच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.