---Advertisement---
---Advertisement---
प्रवाश्यांच्या कम्पार्टमेंटमध्ये शिरुन प्रवाश्यांच्या सीटवर माजी सैनिकाने जबरीने कब्जा केला. जाब विचारणाऱ्या प्रवाश्यांना शिवीगाळ केली. कोचमध्ये आलेल्या टीसीची कॉलर धरत गळ्यावर चापट मारली. ही घटना गुरुवारी (२४ जुलै) कर्नाटक एक्सप्रेसमध्ये एस. फोर कोचमध्ये घडली.
जळगाव येथे रेल्वे पोलिसांनी माजी सैनिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर प्रवाश्यांसह टीसीने सुटकेचा निःश्वास टाकला.
श्याम गायकवाड (४१, मु.पो. कुंदेंवाडी, ता. निफाड) हे मनमाड रेल्वे स्टेशन हेडक्वार्टर येथे कार्यरत आहेत. ते रेल्वे प्रवासी गाडीमध्ये चल तिकीट परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतात.
सीटवर कब्जा करत आरडाओरड
गुरुवारी (२४ जुलै) डाऊन कर्नाटक एक्सप्रेसवर मनमाड ते इटारसी अशी त्यांची ड्युटी कोच नं.एस-थ्री, एस-फोर, एस फाईव्ह अशा तीन कोचवर होती. मनमाड येथून रेल्वे सुटल्यानंतर टीसी श्याम गायकवाड कोच नं. एस-फाईव्ह मध्ये प्रवाश्यांचे तिकीट चेक करु लागले. दरम्यान याठिकाणी एस-फोर कोचमधील पाच ते सहा प्रवाश्यांनी टीसी गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. या प्रवाश्यांनी सांगितले की, आमच्या कम्पार्टमेंटमध्ये एक प्रवासी आमच्या सीटवर जबरीने बसून आम्हालाच शिवीगाळ करीत आरडाओरड करत आहे, अशी तक्रार केली. त्यानंतर तक्रारदार प्रवाश्यांसह टीसी गायकवाड एस-फोर कोचकडे रवाना झाले.
जळगाव स्टेशनवर घेतले ताब्यात
टी.सी. गायकवाड यांनी तत्काळ जळगाव रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधुन माहिती दिली. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर एस. फोर कोचवर पोलिसांना पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार रेल्वे स्टेशनवर आल्यावर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत रेल्वे पोलीस ठाण्यात नेले.
रेल्वे एएसआय परदेशी यांनी त्याची विचारपूस केली असता हिरामण तुळशिराम निकम (वय ३९, सेवानिवृत्त माजी सैनिक, रा. हिंगळवाडी, पाले बु., जि. नाशिक) असे नाव त्याने सांगितले. त्याच्याकडे पुष्पक एक्सप्रेसचे रेल्वे तिकीट मिळुन आले. शासकीय कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी टी.सी. गायकवाड यांनी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार रवी पाटील, नंदु खाडे, सतीश पाटील, राहुल गवळी यांनी माजी सैनिकाला शासकीय रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर गुन्हा व कागदपत्रासह जीआरपी चाळीसगाव येथे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनात वर्ग केला. पुढील तपास चाळीसगाव जीआरपी एपीआय शुभांगी ढगे करीत आहेत.
टीसीला धमकावले
टीसी गायकवाड यांनी त्या प्रवासी इसमाला त्याचे तिकीट व प्रवासाबाबत विचारपूस केली. या कोचमध्ये सीटसंदर्भात विचारपूस केली असता काही एक कारण नसतांना संशयित इसम टीसी यांना शिवीगाळ करु लागला. तिकीट न दाखवता त्यांच्या अंगावर धावून गेला. टीसी गायकवाड यांची कॉलर धरली. या झटापटीत टीसींच्या शर्टची तीन बटने तुटली. प्रकार कळताच रेल्वेतील हेड टी.सी. सुनील मोरे, हेड टी.सी. वाल्मिक भाबड, हेड टी.सी.के.एस.पवार आदी सहकारी एस. फोर कोचमध्ये आले. या सहकाऱ्यांनी संशयित इसमाची समजुत घातली असता त्याने पुन्हा गायकवाड यांना अश्लील शिवीगाळ केली. डब्यातून फेकुन देण्याचीही धमकी दिली.