---Advertisement---
सार्वजनिक बांधकाम उपविभागातील गैरकारभारा विरोधात राम पाटील डोरले यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी वाशीम शहर पोलिस स्टेशन येथे २३ जुलै रोजी तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे व तत्कालीन आवक – जावक लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम डोरले यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, वाशीम शहरातील विकास कामांबाबत २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग व संबंधित ठेकेदाराविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधानांच्या पोहरादेवी येथील कार्यक्रमात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले होते.
त्यानंतर, अभियंता दिनकर नागे यांनी एक बनावट पत्र तयार करून राम डोरले यांची खोटी सही व चुकीचे नाव लिहून ते पत्र उपमुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई) यांच्या नावाने तयार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. हे खोटे पत्र शासकीय दस्तावेजात दाखल करून ठेकेदाराच्या बाजूने संगनमताने फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीवरून वाशीम शहर पोलिसांनी २३ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (३), ३३६ (२) (३), ३४० (२), ३ (५) अन्वये तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे व तत्कालीन आवक-जावक लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.