---Advertisement---
---Advertisement---
अमळनेर : “इतका निधी आणला, इतका निधी आणला” अशा घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता नागरिकांचा थेट सवाल केला आहे. निधी आणला तर तो निधी गेला कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अमळनेर तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा पाहता, कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष वास्तव यात प्रचंड तफावत असल्याचे दिसून येत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरुन वाहनधारकांसाठी प्रवास म्हणजे धोका आणि जीवावर बेतणारी कसरत बनली आहे.
शहरातील कलागुरुनगर, रामनगर, सुरभी कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, विद्या विहार कॉलनी, शिरुड नाका, आर. के. नगर या भागांतील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरू होताच रस्ते चिखलमय होऊन जातात. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्यांच्या आजारात वाढ झाली असून त्यांच्या वाहनांचे देखील नुकसान होत आहे.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांत खड्डे असल्याने पायी चालणे देखील कठीण झाले आहे. यातच ८० फुटी रस्त्याचे चालू असलेले काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. याठिकाणी चिखल, पाणथळ्या आणि धोकादायक खड्ड्यांचा त्रासात दुप्पटीने वाढ झाली आहे.
रस्त्यांच्या दुर्दशेबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. उलट, प्रसिद्धीपत्रकांतून मोठमोठ्या दावे करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डेमय रस्त्यांतून वाट काढत हाल सोसावे लागत आहेत. दरम्यान, ‘कागदावरचे विकासकाम नकोत, आम्हाला खऱ्या रस्त्यांची गरज आहे,’ असा स्पष्ट संदेश नागरिकांकडून देण्यात येत आहे.