---Advertisement---
---Advertisement---
Dhule News : इच्छुक तरुणांना लग्नासाठी मुली – दाखविल्या. मुलीशी लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात शिंदखेडा तालुक्यातील दोन तरुणांकडून प्रत्येकी दोन लाख ७० हजार याप्रमाणे सुमारे पाच लाख ४० हजारांची रोकड घेतली. विवाह झाल्यानंतर नववधू सासरी काही दिवस नांदली. त्यानंतर लग्नात मिळालेले दागिने, मोबाईल, असा सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल चोरून रफूचक्कर झाली. शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील तरुणाच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात हे स्थळ सुचविणारे वारूड (ता. शिंदखेडा) येथील दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली.
वारूड (ता. शिंदखेडा) येथे ९ ते २० जून २०२५ या कालावधीत वारूड येथील दाम्पत्यासह अकोला येथील एजंट, अशा तिघांनी विलास केशव दोरीक, संगीता विलास दोरीक (दोन्ही रा. वारूड, ता. शिंदखेडा), एजंट मनीष माणिक पवार (रा. अकोला) यांनी विवाहेच्छुक तरुण हुकूमचंद साहेबराव भदाणे (वय ३४, रा. वारूड, ता. शिंदखेडा), तसेच योगेश हिंमत सोनवणे (रा. वारूड) यांच्या लग्नासाठी मुलीचे स्थळ असून, विवाह जमवून देतो, अशी बतावणी केली.
नवरी मुलीचे खोटे दाखले, बनावट आधार कार्ड यांचा वापर संशयितांनी केला. यापूर्वी विवाह झालेल्या या तरुर्णीना नववधू असल्याची खोटी माहिती तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांना दिली. नवरी मुलगी दाखविली. या मुलीचे लग्न लावून देण्याचे मोबदल्यात दोघा तरुणांकडून प्रत्येकी दोन लाख ७० हजार याप्रमाणे दोन्ही नवरदेव मुलांकडून पाच लाख ४० हजार रुपये घेतले. हुकूमचंद भदाणे याच्याशी प्रतीक्षा नीलेश लहाने हिचा, तर योगेश सोनवणे याच्याशी नयना परसराम राठोड हिचा विवाह लावून देण्यात आला.
विवाहानंतर काही दिवस नवरी मुलगी पतीच्या घरी सासरी नांदली. हुकूमचंद याची पत्नी प्रतीक्षा ही घरातील पाच हजारांचा मोबाइल, १५ ग्रॅमचा सुमारे ७५ हजारांचा सोन्याचा तुकडा, असा मुद्देमाल घेऊन पसार झाली. याप्रकरणी हुकूमचंद भदाणे याच्या तक्रारीनुसार विलास केशव दोरीक, संगीता विलास दोरीक (दोन्ही रा. वारूड, ता. शिंदखेडा), एजंट मनीष माणिक पवार (रा. अकोला), नवरी मुलगी प्रतीक्षा नीलेश लहाने, नवरी मुलीची आई ज्योती नीलेश लहाने (दोन्ही रा. अकोला) यांच्याविरुद्ध शिंदखेडा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पथक संशयितांचा शोध घेत असताना विलास दोरीक (वय ४३) तसेच संगीता दोरीक (संगीता बंडू डांगेः वय ३५, दोन्ही रा. वारूड, ता. शिंदखेडा) यांना अटक केली. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश मोरे, उपनिरीक्षक रवींद्र महाले, हवालदार ललित पाटील, भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, पोलिस नाईक भुरा पाटील, पोलिस शिपाई विनोद कोळी, महिला पोलिस शिपाई अनिता पवार, चालक पोलिस शिपाई सूरजकुमार सावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक रवींद्र महाले तपास करीत आहेत.