---Advertisement---

चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, १६ लाख ९५ हजारांचे दागिने हस्तगत

---Advertisement---

शहादा जाणाऱ्या येथून शिरपूरला प्रवासी वाहनातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १६ लाख ९५ हजार ६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शहाद्यातून १० एप्रिलला परेश मुकेश कोठारी (वय ३५, रा. कांदिवली, मुंबई) हे सुमारे १८ लाख ५६ हजार ३१० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिरपूरला घेऊन जात होते. ते प्रवासी वाहनात (एमएच १८, एन ६५७७) बसले होते. त्या वेळी त्यांच्याशेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या बॅगमधून २१५.८५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबविले. घटनेनंतर सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना ३१ जुलैला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना, चोरीच्या घटनेत सांगितलेल्या वर्णनाचा एक संशयित व्यक्ती शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी धान्य मार्केट परिसरात शोध घेतला असता, मागील बाजूला संशयित व्यक्ती पोलिसांना मिळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मगन चिमा वसावे (वय २४, रा. खरवडचा आगरबारी पाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे नाव सांगितले. सखोल चौकशी केल्यानंतर त्याने शहादा-शिरपूर रस्त्यावर प्रवासी वाहनातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयिताला सारंगखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्याला अटक करण्यात आली. संशयिताकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी १९७.१० ग्रॅमचे सुमारे १६ लाख ९५ हजार ६० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सारंगखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रमेश वावरे, उपनिरीक्षक किरण बाहे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलिस नाईक विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलिस शिपाई शोएब शेख, सतीश घुले, भरत उगले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---