Vasant Hankare : आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कृत्ये करू नका!

---Advertisement---

 

Vasant Hankare : भडगाव, प्रतिनिधी : आई-वडील आपल्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतोनात कष्ट उपसत असतात. मुलांसाठी आई-बापा इतके श्रेष्ठ दैवत कोणीच नाही म्हणून आपल्या आई-वडिलांची सेवा करणे, त्यांचा मानसन्मान वाढेल, असं वागणं व तसं कर्तृत्व करणं हे प्रत्येक मुलाचं आद्य कर्तव्य आहे. सद्य:स्थितीत मुलं-मुली, आई-वडिलांचा मान-सन्मान ठेवत नाही, त्यांना आपली मान खाली घालावी लागेल, अशी घाणेरडी कृत्य करतात. म्हणून आई-बाप समजून सांगण्यासाठी मी आपणाकडे आलो आहे, असे भावनिक आवाहन करून विविध हृदयस्पर्शी प्रसंग डोळ्यासमोर उभे करून श्रोत्यांना वसंत हंकारे यांनी हसवले व रडवलेदेखील.

केशवसूत ज्ञान प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेतील ‌‘आई-बाप समजून घेताना’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. व्यासपीठावर पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, युवा उद्योजक आकाश वाघ, माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, विनय जकातदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आई-वडिलांची महती कुटुंबातील विविध भावस्पर्शी प्रसंग आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने व आपल्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांसमोर जिवंतपणे उभे केले व आई म्हणजे काय असते? बाप म्हणजे काय असतो? याविषयी तरुणांच्या डोळ्यात अंजन घातले. तरुणांमधील व्यसनाधिनता, प्रेम प्रकरणातून घरून पळून जाणे, आई वडिलांना ओळखत नाही, असे सांगणे अशा विविध प्रसंगातून आई वडिलांची महती सांगितली. या व्याख्यानास प्रचंड संख्येने उपस्थिती होती.

सभागृह झाले भावनाविवश अन्‌‍ निशब्द

उपस्थित श्रोत्यात मुलांसह आलेल्या बापाना एका रेषेत उभे केले व बापाची महती सांगितली व नंतर त्यांच्या मुलांना एका रेषेत त्यांच्यासमोर उभे करून बाप म्हणजे कोण असतो हे सांगितले. याप्रसंगी मुलांनी आपल्या बापानं रडत-रडत मिठी मारली, महिला स्फुंदून-स्पंदून रडत आपल्या पदराने अश्रू पुसत होत्या. तेव्हा सर्व सभागृह निशब्द व भावनाशील झाले होते.

सदर पुष्प माजी आमदार दिलीप वाघ व संजय वाघ यांनी आपले पिताश्री कैलासवासी ओंकारआपा वाघ व मातोश्री लक्ष्मीबाई वाघ यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रायोजित केले होते. सूत्रसंचालन अध्यक्ष विजयराव देशपांडे यांनी, तर आभार उपाध्यक्ष डॉ. ईश्वरसिंग परदेशी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---