---Advertisement---
जळगाव : शहरातील महापालिकेला राज्य शासनाकडून पंधराव्या वित्तीय आयोगाचा निधी सलग दोन वर्षांपासून मिळालेला नाही. दरवर्षी सरासरी २० कोटी रुपयांचा निधी मनपाला मिळत असतो. मात्र २०२४ व २०२५ या दोन आर्थिक वर्षांत हा निधी थांबविण्यात आला आहे. परिणामी शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना, विशेषतः घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाला हा निधी नियमितपणे मिळत असून त्यात समांतर वाटप केले जाते. मात्र मनपाला निधी न मिळाल्याने शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प, वाहतूक व संकलन व्यवस्था, तसेच नवीन यंत्रसामग्री खरेदीचे काम ठप्प झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेली घनकचरा व्यवस्थापन प्रणाली निधीअभावी अपूर्ण राहिल्याने शहरातस्वच्छतेचे प्रश्न गंभीर होत आहेत.
मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत निधी न मिळाल्याने प्रकल्पासाठी ठरवलेली कामे रेंगाळली आहेत. कचरा प्रक्रिया केंद्रात आवश्यक यंत्रसामग्री बसविणे, वाहने दुरुस्ती, तसेच नवीन संकलन केंद्रे उभारणीची कामे थांबली आहेत. यामुळे नागरिकांना दररोज कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला निधी मिळणे अत्यावश्यक होते. मात्र निधीअभावी प्रकल्पाची गती मंदावली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे.









