---Advertisement---
जळगाव : जळगावची चौफेर विस्तारीकरणाची वाटचाल सुरू असताना, राजकीय इच्छाशक्ती, नियोजनासह पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग मंदावला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात कृषी निगडित मोठे प्रक्रिया उद्योग उभारण्याची अजूनही संधी असून, ते उभे राहिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.
शहरासह जिल्ह्यात शिक्षणव्यवस्था, सिंचनाचे लहान-मोठे प्रकल्प, नावीन्यतेचा ध्यास घेणारी माणसे आपापल्या पद्धतीने विकासाकडे वाटचाल करीत आहेत. या विकासात किंवा प्रगतीत जैन इरिगेशनचा सिंहाचा वाटा आहे. जळगाव हे तीन राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि विमान प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे शहर आहे. सुवर्णनगरी, डाळनगरी, प्लास्टिकनगरी अशी जळगावची ओळख आहे. जिल्ह्यात डाळ मिल, प्लास्टिक किंवा चटई कंपन्या, तेलनिर्मिती कंपन्या, कृषी निगडित उद्योग, इंजिनिअरिंग वर्कशॉप्स, केमिकल कंपन्यांची संख्याही मोठी आहे.
नवीन नियमावलीनुसार शहरात बऱ्याच वाढीव भागांत बारा ते सोळा मजली निवासी टॉवरचे काम प्रगतिपथावर आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिक किंवा पर्यटनाशी निगडित सर्व व्यावसायिकांना चटई निर्देशांकात वाढ केली असून, भविष्यात शहरात सतरा मजली महापालिका प्रशासकीय इमारतीसोबतच इतर निवासी टॉवर दिसू लागतील. जळगाव विमानतळावरून राज्यभर व देशभरातल्या अनेक भागांत विमान उड्डाणे होतील, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत.
केळी, कापूस निगडित उद्योगांचा अभाव
जिल्ह्याची केळी आणि कापूस प्रसिद्ध आहे. कल्पवृक्ष असलेल्या केळीमुळे जळगावचे अर्थकारण वाढले आहे. दोघांना केवळ देशातच नव्हे; तर परदेशातही मोठी मागणी असते. निर्यातक्षम केळीचा विचार केल्यास इक्वेडोर, फिलिपिन्स, कोस्टारिका, कोलंबिया या केळी उत्पादक आघाडीच्या देशांनाही मागे टाकले आहे. सरासरी प्रतिहेक्टरी 70 टन उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते. केळीच्या निर्यातीतून देशाला जिल्ह्याने परकीय चलन मिळवून दिले आहे. मात्र, केळी व कापूस या दोन्हींशी निगडित एकही मोठा प्रक्रिया उद्योग जळगावात नाही. केळीपासून वाइन बनविण्याच्या प्रकल्पही कधी सुरू होईल? हे सांगता येणार नाही. कापसाबाबतही तीच परिस्थिती आहे. जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने जिनिंग- प्रेसिंग कंपन्यांची संख्याही मोठी आहे. जामनेर, शेंदुर्णी, पहूर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आदी ठिकाणी जिनिंगची संख्या दीड हजारावर आहे. मात्र, कापसाशी निगडित येथे एकही मोठा प्रकल्प नाही.
जळगावात मोजकेच मोठे उद्योग
जैन उद्योगसमूह, रेमंड, सुप्रीम, स्पेक्ट्रम, एफबीएमएलसारखे मोजकेच मोठे उद्योग आहेत. अन्य मोठे उद्योग सुरू व्हायला हवेत. जळगाव औद्योगिक वसाहत 632 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारली आहे. मात्र, सद्यःस्थितीत जे अडीच हजारांवर उद्योग सुरू आहेत, त्यांपैकी 50 टक्के उद्योग अडचणीत आहेत. आजही जे उद्योग सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश उद्योग स्थानिक तरुणांनी सुरू केले आहेत. सद्यःस्थितीत औद्योगिक वसाहतीत डाळप्रक्रिया, तेलनिर्मिती कंपन्या, कृषीवर आधारित पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या उद्योगांसह केमिकल्सचे चार-पाच प्रकल्प आहेत. सध्या चटई उत्पादनाची दीडशेवर युनिट आहेत. डाळ निर्यातीतही जिल्हा अग्रस्थानी आहे. सद्यःस्थितीत 80 ते 90 उद्योग आहेत. यातच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे डाळ उद्योगाची चाके मंदावली आहेत. पीव्हीसी पाइप, एचडीपीई पाइप व ठिबक उत्पादन करणाऱ्या उद्योगांची संख्या सध्या 170 पेक्षा अधिक आहेत. पाइप तयार करणारे पाचशेवर उद्योग महाराष्ट्रात आहेत. जिल्ह्यात त्यापैकी तीस टक्के उद्योग आहेत. कमी भांडवलावर ग्रामीण भागात डाळ प्रक्रिया उद्योग उभारल्यास त्याद्वारे विविध डाळी व डाळींचे पदार्थ तयार केल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
अनेक प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्हच
जळगावला भारत फोर्स कंपनी येणार होती. त्यांनी सध्याच्या विमानतळाजवळील सुमारे शंभर एकर जागाही खरेदी केली होती. मात्र, ती कंपनी आली नाही. यासह सध्या छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंजमधील बजाज ऑटोचा प्रकल्प जळगावात प्रस्तावित होता. मात्र, तोही जळगावला आला नाही. शिवाय, शहराचा औद्योगिक विकास करण्याच्या हेतूने राज्यातील पहिली इंडस्ट्रिअल टाउनशिप औद्योगिक वसाहतीत स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नंतर महापालिकेने घेतलेली विरोधातील भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे ती झाली नाही.
जळगावात दागिनेनिर्मिती उद्योगाची संधी
जळगावचा सुवर्ण बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्वासार्हता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून सातत्याने मोठ्या प्रमाणावर सोन्याचे चोखंदळ ग्राहक जळगावात येतात. यामुळेच जळगावला सुवर्णनगरीही म्हटले जाते. या सुवर्ण बाजारपेठेला तब्बल पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. 1864 मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. पुढील काळात ती विस्तारत गेली. आजमितीस जळगाव शहरात सुमारे 150 सुवर्णपेढ्या व सुवर्ण मॉल्स आहेत, तर जिल्ह्याची आकडेवारी 500च्या वर आहे. शोरूम संस्कृतीची मुहूर्तमेढ आर. सी. बाफना या फर्मने रोवली. आता सुवर्णनगरीत दागिनेनिर्मिती उद्योगास संधी आहे. सद्यःस्थितीत दीडशेवर दागिनेनिर्मिती उद्योग आहेत. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोक्याचे
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोक्याच्या ठिकाणी असून, येथून महाराष्ट्रातील मोठ्या शहरांसह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांशी कनेक्टिव्हिटी आहे. शिवाय येथे आधीपासून रेल्वेचे मोठे जाळे होतेच. आता चौपदरीकरण होऊन रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. जळगावात नाइट लँडिंगसह अद्ययावत विमानतळ असून, त्याची मुंबई, पुणे, हैदराबाद, गोव्याशी कनेक्टिव्हिटी आहे. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकची सेवा सुरू लवकरच सुरू होईल. अहमदाबादला जोडणारी विमानसेवा सुरू होती. ती बंद पडली असली, तरी अन्य शहरांना या विमानतळाशी जोडण्याचे प्रस्ताव आहेत. सध्या येथून नियमित विमानसेवा सुरू झाल्यास जळगावचा व्यापार-उद्योग आणखी वाढेल.
चौपदरीकरणामुळे दळणवळणही सोयीस्कर
दळणवळणाची साधने वाढल्याने प्रत्येक क्षेत्राने प्रगतीची उंची गाठली आहे. काळानुरूप महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे सद्यःस्थितीतील रस्त्यांची रुंदी कमी पडू लागली. त्यामुळे 1972 मध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहाचे 44 वर्षांनंतर चौपदरीकरण केले जाते आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. सध्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच भविष्याचा वेध घेऊन सहापदरी महामार्गाच्या दृष्टीने आतापासूनच भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक कॉरिडॉरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ सांघवी येथे समृद्धीचा नोडल पॉइंट आहे. तेथून समृद्धी महामार्ग जळगावला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
जैन उद्योगसमूह जिल्ह्याचा आर्थिक कणा
जैन उद्योगसमूहाचा जिल्ह्याच्या संपन्नतेत मोलाचा सहभाग असून, ठिबक, पाइप, ऊतिसंवर्धित रोपे आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहे. या तंत्राचा उपयोग करून शेतकरी दुपटीहून अधिक कृषिमालाचे उत्पादन करीत आहेत. भवरलाल जैन यांनी 1963 मध्ये अवघ्या सात हजारांच्या बीजभांडवलावर जैन इरिगेशनची मुहूर्तमेढ रोवली. आज जैन उद्योगसमूहाचा विस्तार जगभर झाला आहे. 12 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. जिल्ह्यात 75 टक्के कर्मचारी आहेत. जैन उद्योगसमूह हा जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे.
विकासाआड येणाऱ्या काय आहेत अडचणी?
जळगाव औद्योगिक वसाहतीत उद्योगांना अडचणीच आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. करांचा मोठा अडथळा आहे. तो म्हणजे दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था करवसुली करतात. महापालिका मालमत्ता कर वसूल करते आणि दुसरे म्हणजे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सेवाकर वसूल करते. मात्र, उद्योजक व उद्योगांना सुविधा मिळता का? येथे नवीन उद्योगांना जागा मिळत नाही. औद्योगिक वसाहतीतील सर्व भूखंड आरक्षित केले आहेत. त्यातील बहुतांश उद्योग बंद पडले आहेत. काही भूखंडांवर उद्योगच सुरू करण्यात आले नाहीत. अजूनही उद्योजकांना मंजूर झालेले भूखंड मिळालेले नाहीत. त्यामुळे उद्योग उभारण्याची इच्छा असताना अनेकांना या उदासीन धोरणाचा फटका बसतो. पोषक वातावरण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे जळगाव औद्योगिक वसाहतीचा विकास रखडला आहे. उद्योगांच्या विकासासाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारची उदासीनताही आतापर्यंत विकासाआड येत आहे. जिल्ह्यात या उद्योग विस्तारासाठी जवळपास पन्नास वर्षांचा कालखंड पाहता, अजूनही अपेक्षित विस्तार विकास झालेला नाही. जळगावात नवीन उद्योग उभे राहणे, विस्तारण्याचे प्रमाण नगण्य आहे. शासनाकडून क्लस्टरसारख्या सुविधा मिळाल्या, तर या क्षेत्राला जागतिक पातळीवर विस्ताराच्या आणखी संधी आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केळीच्या मुद्यावर एकजूट करून या पॉलिहाउससाठी केळी पिकाला अनुदान उपलब्ध करून दिले पाहिजे. विशेषतः दोन्ही खासदारांनी त्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचे महाराष्ट्र आणि देशभर योग्य पद्धती प्रसार- प्रसार केल्यास पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था भक्कम होऊन हजारो हातांना रोजगार मिळू शकतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर सांघिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे.








