---Advertisement---
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे जिल्हावासियांना हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. अशात पुन्हा राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषता उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे आदि ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसात किमान तापमान १२ अंशांपर्यंत घसरले असून, दैनंदिन सरासरीत २ ते ३ अंशांची घट झाली आहे. त्यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात सकाळी धुक्याचे दाट थर पाहायला मिळाले. हवामान विभागाने अजून दोन तीन दिवसांपर्यंत (दि. २२ नोव्हेंबर) पर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
जळगाव शहरात गेल्या आठवडाभरापासून थंडीच्या तीव्रतेत चढ-उतार होत आहेत. सात दिवसांपूर्वी किमान तापमान १२ ते १६ अंशांच्या आसपास होते. यानंतर पारा काही अंशानी वाढल्याने थंडी कमी जाणवत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीचा जोर वाढला आहे.
रविवारी आणि सोमवार संध्याकाळपासून शहरात तसेच जिल्हाभरात अचानक गारवा पसरला. रात्रभरात तापमानात घसरण झाल्याने मंगळवारी पहाटे थंडीचा कडाका जाणवत होता. दैनंदिन कमाल तापम ानातही १.२ अंशाची घसरण होऊन दिवसभरात पारा २८.८ अंशांवर स्थिरावला. सापेक्ष आर्द्रता २८ ते १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली असल्याने, सायंकाळनंतर गारठा पुन्हा अधिक जाणवत आहे.
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी, राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषता उत्तर म हाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे आदि ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरणार असून ग्रामीण भागातच नव्हेतर शहरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसाही जाणवत आहे.









