---Advertisement---
नंदुरबार : स्नॅपचॅट अॅप्लिकेशनवर ओळख निर्माण करून एकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर प्रसारित केले. ही धक्कादायक सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन वर्षांपूर्वी जयेश पटेल (रा. पिसावळ, ता. कुकरमुंडा, जि. तापी) याच्याशी त्यांची स्नॅपचॅट अॅप्लिकेशनद्वारे ओळख झाली. जयेश पटेलने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो, असे भासवले. याच दरम्यान त्याने फिर्यादीला व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह होण्यास भाग पाडले.
त्यानंतर जयेश पटेलने त्याचा मित्र हिमांशू राजेंद्र पटेल (वय २२, रा. मोहिदा त. श., ता. शहादा, जि. नंदुरबार) याला याबद्दल सांगितले किंवा रेकॉर्डिंग करून दिली. यानंतर हिमांशू पटेलनेही फिर्यादीला हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत स्नॅपचॅट आणि व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह होण्यास भाग पाडले.
दोघांनी व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग दुसऱ्या मोबाइलमध्ये करून सुमारे दोन महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित केले. यामुळे फिर्यादीची समाजात बदनामी झाली आहे.
या गंभीर घटनेनंतर पीडित तरुणीने १७ नोव्हेंबरला सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोघांविरुद्ध गु. र. नं. १७७/२०२५ नुसार भादंवि आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश देसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागूल तपास करीत आहेत.









