---Advertisement---
नशिराबाद : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती करून विजयाच्या इराद्याने कंबर कसली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये नगरसेवकपदाच्या जागांचे वाटप झाले असून भाजपला १० तर शिंदे गटाला १० जागा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीतर्फे नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रतिष्ठेची मानून जोरदार तयारी सुरू केली आहे. युतीला प्रथम वेळचे नगराध्यक्षपद टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र गटबाजी वेळीच संपुष्टात न आल्यास पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी काही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. उबाठा शिवसेने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि प्रहार, एमआयएम यांचे पाठबळ मिळणार असल्याचे संकेत आहेत.
निवडणुकीसाठी राजकीय पक्षनिहाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार असे भाजप-शिंदे शिवसेना युतीतर्फे योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे गणेश चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), उबाठा शिवसेनेच्या मित्र पक्षांनी त्यांचे अंतर्गत मतभेद व हेवेदावे बाजूला ठेवून ‘आपला खरा स्पर्धक कोण?’ हे जाणून घेतले आणि एक भक्कम विरोधी आघाडी उभी केली तर ते युतीपुढे कडवे आव्हान निर्माण करू शकतील. मात्र जर विरोधी पक्षांनी प्रभावी आव्हान उभे केले नाही तर ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









