दुर्दैवी! परीक्षा देण्यासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं…

---Advertisement---

 

जळगाव : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी निघालेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.

पवार हे पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत होते. दुचाकीने आल्यावर परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष होते.

हळदी समारंभात नाचताना नालखेड्यात तरुणाचा मृत्यू

लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात बॅण्डच्या तालावर नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नालखेडा (ता. अमळनेर) येथे २१ रोजी रात्री घडली. यामुळे मयताच्या मामाच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्याचे आनंदाचे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलले. अतुल ज्ञानेश्वर कोळी (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तो निंभोरा ता. धरणगाव येथील रहिवासी होता. सध्या तो नालखेडा येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री नातलगाच्या लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात बॅण्डच्या तालावर नृत्य करत असताना तो अचानक खाली कोसळला. उपस्थितांनी त्वरित दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात क्षणार्धात दुःखाची छाया पसरली. अतुल हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---