---Advertisement---
चंद्रशेखर जोशी
जळगाव दिनांक : राजकारणात कोणत्याही व्यक्तीचे कायम प्राबल्य कधीच नसते. प्रत्येकाच्या कार्याच्या लौकीकावर त्या व्यक्तीचे राजकीय व सामाजिक आयुष्य अवलंबून असते. मात्र सत्तेची हवा लागल्यावर अनेक जण बदलतात. जळगाव जिल्ह्याचा, जिल्ह्यातील विकासाचा विचार करता एक गोष्ट कायम बोलली जाते. जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय घेऊन काम करण्याची तयारी फार कमी नेत्यांनी दाखवली, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. सध्या पालिकांच्या निवडणुकांचे वादळ सुरू आहे. या पाठोपाठ जिल्हा परिषद व त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकांची तयारी आहे. राजकीय पक्षांकडून या सर्व पातळ्यांवर तयारी सुरू असल्याचे लक्षात येते. प्रत्येक संस्था ताब्यात रहावी असे प्रयत्न राजकीय पक्षांचे आहे व ही अपेक्षा चुकीचीही नाही. त्यामुळे कोण कोण यश मिळवू शकते व ते आपल्याकडे कसे वळतील असे प्रयत्न राजकीय पक्षांकडून केले जात आहेत. यात भारतीय जनता पक्षाकडे अनेकांचा कल दिसून येतोय. जळगाव महापालिकेत वर्षानुवर्षे सत्तेत राहीलेल्या काही माजी नगरसेवकांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपतील जुन्या कार्यकर्त्यांकडून काही प्रमाणात नाराजीही व्यक्त झाली, पण मोठा गाजावाजा करत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्याच्या चर्चा आजही सुरू आहेत.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी या संदर्भात नुकतीच काही प्रतिक्रीया व्यक्त केली. शहराच्या विकासावर भाष्य केले. नितीन लढ्ढा यांनी निवडणूक लढवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. साधारण 1980 ते 2001 असा मोठा राजकीय प्रवास सुरेशदादांचा झाला. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री अशी विविध पदे त्यांनी भुषविली. पालिका काळातील घरकुल प्रकरणामुळे सुरेशदादा व त्यांचे समर्थक अडचणीत आले. त्यांच्यासह 48 नगरसेवकांवर धुळे न्यायालयाने ठपका ठेवत शिक्षा व दंड ठोठावला. त्यातील काही मंडळी आजही राजकारणात सक्रिय आहेत.
सुरेशदादांनी शहरातील विकासावरही काही विचार व्यक्त केले. शहराचे चित्र बदलविण्यासाठी संवेदनशील नेतृत्व हवे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त करून राज्यकर्ते भ्रष्ट असल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्ढावल्या असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसे पाहीले तर पुर्वी पालिकेत काम करणाऱ्यांची हिस्ट्री काय होती? हे सर्वच जाणतात. दादांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा अगदी योग्यच…त्याबाबत दुमत नाही.
जळगाव शहर व जिल्ह्यास मोठी नैसर्गिक संपदा लाभली आहे. तापी-गिरणाच्या परिसरामुळे भरघोस पाणी, चांगले रस्ते आता विमान सेवा या सर्व सुविधा असताना येथे ना पूर्वी उद्योग टिकू शकले आणि भविष्यात दूर दूर पर्यंत तशी शक्यताही नाही. याला अगदी पूर्वीचे व आताचेही राजकारणी कारणीभूत आहेत. जळगाव शहराच्या औद्योगिक क्षेत्रात बरेच उद्योग होते…त्यांना फारशा सवलती मिळू शकल्या नाही परिणामी अनेकांनी येथील बस्तान गुंडाळले. केवळ भव्य व्यापारी संकुलांची उभारणी याला विकास म्हणता येणार नाही. जळगावचे सिंगापूर करू हे सुरेदादांचे स्वप्न होते, पण काय झाले? शहराच्या राजकारणात चांगल्या व्यक्ती येणे हे खरोखर गरजेचे आहे. नितीन लढ्ढा यांचा विचार केला तर एक अभ्यासु नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत.
चांगले काम करत असताना त्यांना महापौरपद अचानक सोडावे लागले. त्यावेळी झालेली नितीन लढ्ढा यांची मानसिकता, त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू… याचे आम्हीही साक्षीदार आहोत. आणि अशा व्यक्तीमत्वांना निवडणूक लढवू नका, असा सल्ला जर सुरेशदादा देत असतील तर ते चुकीचेच. त्या काळात काही महापौर किती दिव्य होते हे जळगावकर जाणतात. परिस्थिती बदलत नाही ती बदलावी लागत असते. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
शहराच्या विकासासाठी नेमके काय करावे…हे सुरेशदादांनी नक्की सांगावे…पूर्वी राजकारणच जास्त झाले. सुरेशदादा विरूद्ध नाथाभाऊ असे द्वंद्व अनेक वर्षे सुरू होते…राज्यातील पॉवरफुल्ल असे हे दोघे नेते त्यांनी राजकारणाचे जोडे बाहेर ठेऊन कामे केली असती तर या जिल्ह्याचा निश्चित विकास झाला असता यात शंका नाही. आणि ज्यांना विकासाचे व्हिजन आहे…अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाला पाहीजे व त्यांच्या माध्यमातून विकासाची दिशा ठरवली पाहीजे. केवळ विकासावर गप्पा मारून उपयोग नाही…हे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे.









