---Advertisement---
जळगाव : भारतीय सिनेसृष्टीचा ‘ही-मॅन’, रुपेरी पडद्यावरचा देखणा नायक, असंख्य चाहत्यांच्या भावना आपल्या सदाबहार अभिनयातून नेमकेपणाने अभिव्यक्त करणारा कलंदर कलावंत, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांनी सोमवारी जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली आणि बॉलीवूडमधील एक सुवर्ण अध्याय संपला. तुम्हाला माहितेय का? ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना एका गोष्टीची प्रचंड आवड होती, विशेषतः संशोधनासाठी त्यांनी थेट जळगाव गाठलं होत. चला जाणून घेऊयात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काय आवड होती आणि ते जळगाव कधी आले होत, यासंदर्भात.
जैन इरिगेशनचे अशोक जैन यांची श्रध्दांजली
चित्रपट सृष्टितील देखणा व तडफदार कलाकार अशी ओळख धर्मेंद्र देओल यांनी तयार केली होती. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती, त्यांनी आपल्या अभिनयातून अनेकांना मनमुराद आनंद दिला. धर्मेंद्र यांची ‘शोले’ चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना भारावून टाकणारी होती.
‘शोले’ सारखा चित्रपट आजही भावतो, अशी निर्मिती क्वचितच होते, असा चित्रपट होणे नाही. त्यांनी एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणूनही चांगले काम केले होते. त्यांच्या निधनाने आपण एक उत्तम कलाकार गमावला याची उणीव नक्कीच भासेल, अशा शब्दात जैन इरिगेशन सिस्टम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी धर्मेंद्र देओल यांना श्रध्दांजली वाहिली.
धमेंद्र यांना शेतीची होती प्रचंड आवड
शेतीची आवड असल्याने धमेंद्र हे २०१६ मध्ये जळगावात आले होते. त्यांनी केळीसह डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेरू, मोसंबीवर सुरू असलेल्या संशोधनाची माहिती घेतली असल्याचे सांगितले जाते.
औंढे गावात शंभर एकरावर मोठे फार्म हाऊस
धमेंद्र यांचं लोणावळ्याजवळच्या औंढे गावात शंभर एकरावर मोठे फार्म हाऊस असून, त्यांनी जवळपास ६५ एकर शेतीत विविध प्रकारची फळे, कोबी, टोमॅटो, वांगी यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करत असे. शेतीतून मिळणारे उत्पन्न ते शेतात काम करणाऱ्या मजुरांना वाटून देत असे.
चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त देखील आले होते जळगावात
तसेच स्व. निखील खडसे चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त धमेंद्र हे जळगावात आले होते. धर्मेंद्र यांच्यासमवेत बॉबी देओल, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते.









