---Advertisement---
जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायबर पोलिस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी विशेष लक्ष आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या अकाउंटधारकांवर भारतीय न्याय संहिताच्या बीएनस कलम १९७: भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक आणणारे पोस्ट करणे, बीएनएस कलम १९६ : दोन समाजांत तेढ निर्माण करणारे पोस्ट करणे, बीएनएस कलम २९८ धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट करणे, बीएनएस कलम ३५३ (२) वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव निर्माण करण्यासाठी खोटी विधाने किंवा अफवा प्रसारित करणे यांसंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जबाबदारीने पोस्ट कराव्यात. कोणीही चुकीची माहिती, अफवा किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही पोस्ट प्रसारित करू नयेत. असे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
का उचलण्यात आले ‘हे’ पाऊल
निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती, अफवा, द्वेषपूर्ण भाषण, धमकी, बदनामीकारक मजकूर, धार्मिक किंवा जातीय भावना भडकावणाऱ्या पोस्ट /व्हिडीओ / मीम्स तसेच लोकशाहीला आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही पोस्ट प्रसारित होऊ नयेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.









