---Advertisement---
Pachora Municipal Council Election 2025 : पाचोऱ्यात उलथापालथ; नेमकं काय घडलं? : पाचोरा नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्र. ११ मध्ये न्यायालयाच्या निर्णयाने मोठा राजकीय पलटवार घडवून आणला असून दोन्ही जागांवरील भाजप उमेदवारी बदलली आहे. महिला राखीव व सर्वसाधारण या दोन्ही जागांवर भाजपाच एबी फॉर्म मिळालेल्या सिंधू पंडितराव शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेनुसार माघार घेतली आहे.
प्रभागातील दोन्ही जागांसाठी सिंधु शिंदे यांचा पहिल्या क्रमांकाचा फॉर्म असल्याने, भाजपच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांचा अर्ज छाननीवेळी अवैध ठरला होता. यात महिला राखीव जागेत अमरीन अब्दुल रहमान देशमुख व सर्वसाधारण जागेसाठी राहुल अंकुश गायकवाड यांचे अर्ज बाद झाले.
अवैध ठरवल्यानंतर दोघांनीही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने या दोन्ही उमेदवारांच्या अर्जाना वैध ठरवत भाजपच्या अंतर्गत समीकरणाची उलथापालथ केली.
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर भाजपला आज सिंधुताई शिंदे यांचा दोन्ही जागांवरील अर्ज मागे घ्यावा लागला. त्यानंतर महिला राखीव जागेसाठी अमरीन अब्दुल रहमान देशमुख या अधिकृत भाजप उमेदवार झाल्या, तर सर्वसाधारण जागेसाठी राहुल अंकुश गायकवाड यांना ‘भाजप पुरस्कृत अपक्ष’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दोघांचेही अर्ज अधिकृतरीत्या स्वीकारले गेले.
आता नगरसेवक पदासाठी ७९ उमेदवार असून प्रभाग क्र. ११ मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले नवीन राजकीय चित्र निवडणुकीला अधिक रंगतदार बनवणार आहे.









