---Advertisement---
दीपक महाले
जळगाव : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत मित्रपक्षांशी चर्चा निष्फळ ठरल्याने, महायुतीतील घटकपक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढल्या. विधानसभा निवडणुकीतही शहरात भाजप पक्षातील काहींनी बंडखोरी केल्याने, पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी अडचणी वाढल्या होत्या. ही स्थिती लक्षात घेता, जळगाव महापालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 75 जागा लढण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली असून, त्यासंदर्भात बैठकीत रणनीती ठरविण्यात आली.
शहरातील भाजपच्या जी. एम. फाउंडेशनमधील सभागृहात मंगळवारी (9 डिसेंबर) घेण्यात आलेल्या महागर शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरविण्यात आली. बैठकीत प्रदेश संघटनमंत्री चौधरी यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार सुरेश भोळे, महानगर-जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला भारतमाता, पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.. तसेच गोवा दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपचे प्रदेश संघटनमंत्री विजय चौधरी यांनी, राज्यात लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने तयारी केली असून, जळगावात महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व 358 बूथरचनेवर काम करायचे आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबाबतची माहिती पोहोचवून, जनसंपर्क सुरू करावा, असे आवाहन केले.
जळगाव जिल्हा व शहर हा भाजपचा बालेकिल्ला असून, 365 दिवस सदैव काम करणारा कार्यकर्ता आहे. आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व 358 बूथरचनेवर काम आतापासूनच सुरू करावयाचे आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन जनसंपर्क सुरू करावा. महापालिका निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा दावा याप्रसंगी विजय चौधरी यांनी करीत, तरीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सदैव जनतेशी नाळ कायम ठेवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विकास, लाभाच्या विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राचे संकटमोचक जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनात महापालिका निवडणुकांची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी विभागीय संघटनमंत्री अनासपुरे यांनी संघटनात्मक आढावा सादर करीत, विविध कामांविषयी आघाड्या, मोर्चा, मंडळ पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. बैठकीला माजी महानगर-जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारती सोनवणे, माजी पश्चिम जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, माजी महापौर सीमा भोळे यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्या, मोर्चा, मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिकेच्या सर्व 75 जागा लढविण्याची रणनीती
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा समारोप होताच महापालिका निवडणुकांचा घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या बैठकीत प्रामुख्याने महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांशी युती झाली किंवा नाही झाली तरी सर्व 75 जागा लढण्याच्या तयारीत राहावे, असे निर्देश पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना देण्यात आले. गेल्या वेळी भाजपने 57 जागांवर विजय मिळवून महापालिकेत बहुमत मिळवले होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत करण्याच्या हिशेबाने तयारीला लागण्याच्या सूचनाही बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्या.
अन् ‘सतरा मजली’तील सत्ता हातून गेली
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत संकटमोचक मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षातील काही नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपला ‘सतरा मजली’तील सत्ता गमवावी लागली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काही जणांनी बंड पुकारल्याने भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे यंदा आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला अडचणीत आणणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.









