Dhanashree Shinde : बेपत्ता ‘धनश्री’ मृतावस्थेत आढळली; चाळीसगावच्या तरवाडेतील घटना

---Advertisement---

 

जळगाव : शाळेतून घरी निघाली, मात्र बेपत्ता झालेली धनश्री गावालगत असलेल्या एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. तब्बल पाच दिवसांपासून तिचा शोध सुरु होता, मात्र शोध लागत नसल्याने संपूर्ण यंत्रणा हतबल झाली होती. दरम्यान, मंगळवारी (दि. १६ डिसेंबर) सकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगावच्या तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी धनश्री उमेश शिंदे (९ वय) ही शाळेतून घरी निघाली, मात्र रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली होती. शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नव्हती.

आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली; मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नव्हता.

या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, एलसीबीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परिसर व शेतशिवार पिंजून काढत शोधमोहीम सुरू असताना, आज मंगळवारी (दि. १६ डिसेंबर) सकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांचे आवाहन

मृतदेह चाळीसगाव येथे शासकीय रुग्णालयात हलवला असून, घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणीनंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---