खान्देशात बिबट्यांचा उच्छाद; दोन वर्षांत चौघांचा मृत्यू अन्‌‍ बाराशेवर पशुधनांचा फडशा

---Advertisement---

 

कृष्णराज पाटील, दीपक महाले
जळगाव :
खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील ग्रामीणसह शहरी भागात अधिवासात हस्तक्षेपामुळे भक्ष्य शोधार्थ बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, जळगाव जिल्ह्यात बिबट्यांकडून दोन वर्षांत चौघांचा मृत्यू आणि बाराशेवर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही सहा जणांचा मृत्यू, तर पाचशेवर पशुधनांचा फडशा पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागांत भीतीचे वातावरण आहे. सद्यःस्थितीत रब्बी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांमध्ये बिबट्यासह वन्यप्राण्यांची दहशत असल्याचे चित्र आहे. बिबट्यांसह तडस, लांडगे वा अन्य वन्यप्राण्यांचा मानवी वसाहतीत आक्रमण, संचार व हल्ल्यांमुळे परिसरात भागात भीतीचे वातावरण दिसून आले आहे.

बिबट्यांसह वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील पारडी, वासरांसह बकऱ्या अशा सात पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत वर्ष-दोन वर्षात सुमारे बाराशेवर पशुधनांचा बळी गेला आहे. जळगाव विभागात शेतशिवारच नव्हे; तर शहरी भागातही बिबट्यांचा संचार वा हल्ल्यांमुळे मानवी जीवांसह पशुधनहानीच्या घटना पाहता वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावून रेस्क्यू ऑपरेशन करीत आतापर्यंत चार ते पाच बिबटे पकडण्यात आले. पकडलेले बिबटे नागपूर, गोरगाव प्राणी संग्रहालय तसेच अन्य ठिकाणी सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहेत. दुसरीकडे रेस्क्यू सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्राण्यांची संख्या असल्याने बिबटे पाठवावेत कुठे, असा प्रश्न वनविभागासमोर असला, तरी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना कामचलावू व तोकड्या असल्याचे प्रत्ययास येत आहे.

विस्तीर्ण घनदाट वनसंपदा


जळगाव जिल्ह्यात राखीव वनक्षेत्र 801.58 चौरस मैल, तर 764.05 चौरस मैल वनविभागाकडे तसेच 37.53 चौरस मैल महसूल विभागाकडे आहे. वनविभागांतर्गत वेळोवेळी वृक्षरोप लागवड- वनसंवर्धन योजनांमुळे वढोदा, भवानी, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव या परिसरात वनपरिक्षेत्र आहे. तसेच भडगाव, पारोळा, एरंडोल आणि अमळनेर आदी तालुक्यांना जोडणारा डोंगराळ उंच-सखल भाग, तसेच शेकडो नैसर्गिक पाणवठे जलस्त्रोत असून, या ठिकाणी वन्यप्राणी गणनेनुसार बिबटे, पट्टेदार वाघ, हरीण, तडस, बारशिंगा, काळवीट, नीलगायींसह अनेकविध दोन ते तीन हजाराहून अधिक वन्यजीवांचा अधिवास आहे.

नैसर्गिकसह जलस्त्रोतांसह 150 वर कृत्रिम पाणवठे


जिल्ह्यात विविध वनविभाग परिक्षेत्रात तसेच जिल्हाभरात पर्जन्यमान बऱ्यापैकी होते. त्यामुळे वनविभागाकडून बऱ्याच ठिकाणी शतकोटी वृक्ष लागवड योजना प्रभावीपणे राबविण्यात आली असून, समाधानकारक पावसामुळे नैसर्गीक प्रवाह अद्यापही बऱ्यापैकी आहेत. जळगाव उपवन विभागांतर्गत मानवनिर्मित कृत्रिम पाणवठे सरासरी 150 वर असून, त्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहेत.

अधिकारी कर्मचारी क्षेत्रभेटींमध्ये व्यस्त


वनपरिक्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप, वाढते अतिक्रमण, अधिवासात असुरक्षिततेमुळे अन्न-भक्ष्याच्या शोधात बिबट्यांसह अन्य वन्यप्राणी मानवी वसाहतींकडे वळले आहेत. त्यामुळे प्रसंगी शेतशिवारात पशुधनावर तसेच मानवी जीवांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचेच दिसून येत आहे. मात्र, वनविभाग अधिकारी, कर्मचारी मात्र क्षेत्रभेटींमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.

खान्देशात 30-40 बिबटे, बछड्यांचा अंदाज


राज्यभरात बिबट्यांची चार हजारांहून अधिक संख्या वन्यप्राणी गणनेनुसार असून, जळगाव जिल्ह्यात किमान 5 ते 10 बिबटे होते. तसेच 5 ते 7 पट्टेदार वाघांची संख्या आहे; परंतु आढळून येत असलेल्या बिबट्यांच्या उच्छादानुसार जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनच जिल्ह्यांच्या उपवनक्षेत्र परिसरात बछड्यांसह सुमारे 30 ते 40 बिबटे असल्याचा अंदाज आहे.

केळीबागांसह उसाच्या शेतात आश्रय


सद्यःस्थितीत रब्बी हंगाम पेरणीसह अंकुरलेल्या हरभरा, मका, गहू, आदी रोपांच्या आंतरमशागतीची कामांसह कीटकनाशक द्रव्य फवारणी केली जात आहे. शिवाय गिरणा पट्ट्यात केळी, लिंबूसह अन्य फळबागा मोठ्या प्रमाणात असून, या झाडाझुडपांत बिबट्याला लपण्यास जागा आहे. परिसरात बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे परिसरातील पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे.

खान्देशात 10 जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी


जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्ष- दीड वर्षात चाळीसगाव तालुक्यात 3, यावल तालुक्यातील किनगावमधील एक, असे चार, तसेच धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत सहा जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यांत अनेक जण जखमी झाले असून, जून 2025 दरम्यान जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारात वृद्ध महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती.

बिबट्यांच्या हल्ल्यात बारावेशवर अधिक पशुधन हानी


जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव मेहुणबारे, औट्रम घाट परिसर, नांदगाव तालुक्यात शेतशिवार, भडगाव तालुक्यात वाडे, गुढे, गोंडगाव गिरणा नदी पात्र शेतशिवारात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात आतापर्यंत 1 हजार 181 पशुधन हानी झाली आहे. यात 2024-2025 दरम्यान 774 तसेच एप्रिल 2025 ते ऑक्टोबर अखेर 407 असे एकूण 1 हजार 181 पशुधनाच्या मृत्युची नोंद वनविभाग अधिकाऱ्यांनी पंचनाम्यानुसार केली आहे.

मृताच्या कुटुंबियांना अनुदान मदत


जिल्ह्यात गेल्या जानेवारी 24 ते आतापर्यंत चार जणांचा बिबटच्या हल्ल्यात मृत्यू ओढवला आहे. यात तीन मृतकांच्या कुटुंबियांना महसूल व वन विभागांतर्गत दाखल कागदपत्रे तपासणीअंती प्रत्येकी 25 लाख रुपये यानुसार जळगाव विभागात उपवनसंरक्षक प्रवीण ए. यांच्या कार्यकाळात तसेच यावल वनविभागांतर्गत यावल तालुक्यात एका मृताच्या कुटुंबाला उपवनसंरक्षक जमीर एम. शेख यांच्यामार्फत शासनस्तरावरून मदत अनुदान देण्यात आले आहे.

वनविभागांतर्गत पाच बिबट्यांचा मृत्यू


गत वर्ष-दीड वर्षात वनविभागांतर्गत 7 बिबटे, वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे, तर 5 बिबटे मृतावस्थेत आढळून आले असून, त्यांच्यावर वनविभाग नियमानुसार सोपस्कार करण्यात आले असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मूळ अधिवासासह रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी


दरम्यान, जिल्ह्यात चाळीसगाव, मेहूणबारे, रांजणगावसह घाट परिसर नांदगाव शिवारातून आतापर्यंत विविध ठिकाणी सापळे लावून बिबट जेरबंद करण्यात आले. यातील चार ते पाच बिबट्यांचे नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव रेस्क्यू संग्रहालयात स्थलांतर करण्यात आले आहेत.

क्षमतेपेक्षा अधिक प्राणी


जळगाव विभागातून नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची क्षमता केवळ 20 असली तरी सद्यःस्थितीत तेथे क्षमतेच्या अतिरिक्त 10 ते 15 संख्येने बिबट अधिक आहेत. अशीच स्थिती अन्य परिसरातील आहे. यात जखमी अथवा अन्य बिबटे व बछडे पुनर्वसनासाठी आणले तरी अगोदर असलेल्या बिबटमुळे त्यांच्या अधीवासाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय त्यांना भक्ष्य वा निवारा अपूर्णतेमुळे अडचणी निर्माण होणार असून त्यामुळे नाशिक विभागासह अन्य विभागात रेस्क्यू सेंटरमध्ये बिबटचे पुनर्वसन होणे शक्य नसल्याच्या अडचणी समोर येत असल्याचे दिसून आले आहे.

तीन ते चार वेळा पट्टेदार वाघाचे दर्शन


दरम्यान, जानेवारी 2025 च्या सुरूवातीला तसेच फेब्रवारी व त्यानंतर जिल्ह्यात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर रोजी भुसावळ ते मुक्ताईनगर दरम्यान मतदान केंद्रांवर जाण्यापूर्वी रात्रीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनाला पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते.

जळगाव व यावल विभागात तीन हजारांहून अधिक वन्यजीव


जळगाव जिल्ह्यात वनविभागांतर्गत वन्यप्राणी गणनेंतर्गत नीलगाय, हरिण, काळवीट, मोर आणि रानडुक्कर यांची संख्या जास्त आहे. तर तडस, खोकड, घुबड, ससे, चितळ, कोल्हे, अस्वल साळींदर, पांढरे व काळे बगळे यांची संख्या 25 ते 125 दरम्यान आढळले असून 2200 च्यावर विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत. तसेच यावल उपवन परिक्षेत्रांतर्गत देखील सरासरी 1500 च्या वर वन्यजीव संख्या असून मुक्ताईनगर, जामनेर तसेच यावल रेंजमध्ये पट्टेदार वाघांची संख्या पाच ते सात असल्याचेही दिसून आले आहे.

गायी वासरांसह शेळ्यांवर हल्ला


वन्यप्राणीगणनेदरम्यान बिबटची संख्या मर्यादित प्रमाणात असली तरी बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार पहाता 25 ते 50 च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. बिबटचा धावण्याचा वेग ताशी 40 ते 50 कि.मी.नुसार असून घनदाट जाळी, झुडुपांसह केळी, ऊस वा आदी बागांमध्ये आश्रयास असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंतच्या बिबटच्या हल्ल्यांमध्ये विशेषता लहान मुलांवर हल्ले झाले असून शेळी, गायी वासरांचेच भक्ष्य हे लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.

दोन कोटींपेक्षा अधिक मदत अनुदान मंजूर


जळगाव विभागांतर्गत आतापर्यंत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे 1 हजार 181 पशुधनांचा मृत्यू झाला आहे. यात 2024-25 दरम्यान 774 पशुधनाच्या नुकसानीचे 1 कोटी 39 लाख 74 हजार 675 रूपये. तसेच एप्रिल 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान 93 लाख 96 हजार 910 रूपये असे एकूण 1181 पशुधनाच्या नुकसानीची सुमारे 2 कोटी 33 लाख अनुदान रकम शासनस्तरावरून मंजूर करण्यात आली आहे.
– राम धोत्रे (उपवनसंरक्षक, जळगाव)

धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत बिबट्यांसह हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत वाढ

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांसह हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत लक्षणीय वाढ झाली असून, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक नागरिक आणि पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.

खुर्चीमाळ (ता. अक्कलकुवा) येथे जानेवारीत मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात रोडवीबाई खाअल्या नाईक (80) या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तळोदा तालुक्यातील गणेश बुधवल येथे महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मका घेण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय दीपमाला नरसिंग तडवी (रा. सरदार नगर) हिचा मृत्यू झाला आहे. कधी कुणावर बिबट्याचा हल्ला होईल, या भीतीने शेतशिवारातील ग्रामस्थ अजूनही भयभीत आहेत.

धुळे शहरातील नागपूर- सुरत महामार्गावरील साक्री रस्त्यावरील राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यालय व 500 सद्निका असलेल्या क्षेत्रात बिबट्याचा संचार असल्याचे निदर्शनास आले होते. काही जणांनी मोबाइलमध्ये बिबट्या निवांतपणे चालत असल्याचे चित्रीकरणही केले होते. धुळे शहर परिसरात गोंदूर, उमराव नगर, लक्ष्मीनगर, नंदनवन बँक कॉलनी परिसरात लांडग्यांचा संचार दिसून आला. साक्री तालुक्यातील वर्षभरापूर्वी बेहड येथे दिवसा बिबट्याच्या हल्ल्यातून सावध शेतकरी बचावला होता. धमनार, वसमार, ककाणी, राजबाई शेवाळी, चिंचखेडे, भडगाव, काळगाव आदी ठिकाणी बिबट्या आता रोज कुठे ना कुठे तरी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे.

म्हसदीसह काकोर, वसमानर, बोरमळा, सापट्या शिवारात बिबट्याची पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत दर्शन देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वीच शिरपूर तालुक्यातच भरवाडे शिवारात कोंबडीच्या मागे धावत असताना बिबट्या अचानक कोरड्या विहिरीत पडला. ही माहिती मिळताच वनविभाग अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेक्यू ऑपरेशन करीत विहिरीतून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तडसाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.

वनविभागाच्या पळासनेर परिमंडळांतर्गत बिजासणी, तसेच मोहिदा व पळासनेर (तलावपाडा) हे नियतक्षेत्र आहे. यात मोहिदा येथील चंद्रसिंग महारू पावरा (वय 58) यांच्यावर शेतात काम करताना वन्यप्राण्याने हल्ला केला. त्याच दिवशी पळासनेर (तलावपाडा) परिसरात शेळ्या चराईसाठी गेलेल्या चंद्रसिंग रूपसिंग पावरा (वय 62) यांच्यावरही वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे समोर आले. शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीकाठच्या शेतशिवारात बिबट्यांसह वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावती प्रकल्पालगत तसेच मोयाने शिवाराला लागून वनविभागाचे मोठे क्षेत्रफळ आहे. गर्द झाडाझुडपांदरम्यान आढळणारा बिबट्या आता खुलेआम शेतशिवारातील वाड्यावस्त्यांवर येऊ लागला आहे. त्यामुळे सध्या वैंदाणेसह मालपूरकरांची रात्र वैऱ्याची झाली आहे.यामुळे रात्री शेतशिवारात जाणे जोखमीचे बनले आहे. सहज शिकार करणे सुलभ होईल म्हणून बिबटे लहान प्राण्यांवर हल्ला करीत आल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

वनक्षेत्रात असणारे बिबटे आता सावज (भक्ष्य) शोधण्यासाठी शेतशिवारात बिनधास्त फिरत असल्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या माणसाची शिकार करू शकतो, हे वनविभागाने गांभीर्याने घ्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरवेळी पाळीव प्राणी ठार झ्ाल्यावर वनविभागाकडून पंचनामा होता. मात्र, नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची भटकंती मात्र ठरलेलीच असते. वनविभागाने फक्त पंचनामा न करता बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व हल्ल्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने पावले उचलून यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---