---Advertisement---
Jalgaon Weather : गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात थंडीचा जोर वाढला असून, आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आजपासून २७ डिसेंबरपर्यंत देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड, लडाख, अंदमान, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज कुठे आणि किती तापमान आहे?
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, मालेगाव, जेऊर येथे १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात धाराशिवमध्ये 10 अंश सेल्सिअस, तर परभणीत 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
अहिल्यानगर – ९.३
जळगाव – ९.७
नाशिक – ९.५
महाबळेश्वर – १२
कोल्हापूर – १५.३
छत्रपती संभाजीनगर – १२
सोलापूर – १३.८
जळगावात कशी राहणार स्थिती?
हवामान विभागानुसार, आगामी दिवसांत रात्रीच्या तापमानात २ ते ३ अशांनी किरकोळ वाढ होऊ शकते. मात्र, थंडी वाऱ्यांचा वेग आणि वातावरणातील गारठा कायम राहणार असल्याने थंडीची तीव्रता जाणवत राहील.
सकाळच्या वेळेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे काही भागांत दात धुके पडण्याची शक्यता आहे. तशी १५ ते २० किलोमीटर वेगाने थंड वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ही कडाक्याची थंडी जरी सामान्य नागरिकांसाठी हुडहुडी भरवणारी असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी ठरत आहे.
सध्या सुरु असलेल्या थंडीमुळे गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची वाढ अतिशय चांगली होत आहे. थंड आणि स्वच्छ वातावरणामुळे पिकांवर कोणताही रोग वा कीड प्रादुर्भाव दिसून येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत ऐन थंडीत ढगाळ वातावरण आणि अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा वातावरण कोरडे, स्वच्छ आणि थंड असल्याने पिकांची वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकूणच, थंडीचा त्रास असला तरी यंदाची हिवाळी परिस्थिती शेतीसाठी वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.









