---Advertisement---
जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीआधी माजी महापौर ललित कोल्हे जामिनावर बाहेर येणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
जळगावच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के फार्म हाऊसवर सुरु असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत, या कॉल सेंटरच्या माध्यातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातील नागरिकांशी आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हेंसह एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जळगाव पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात ठोस पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे आले, आर्थिक हिस्से कसे ठरवले गेले, कोणाची कोणती भूमिका होती आणि संघटितपणे परदेशी नागरिकांची फसवणूक कशी करण्यात आली, याचा सविस्तर उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. हा गुन्हा संघटित आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात असून त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते , असे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाने तिघांचेही जामीन अर्ज फेटाळले. गुन्ह्याची गंभीरता आणि तपासावर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेता आरोपींना दिलासा देणे योग्य नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
दरम्यान, ललित कोल्हे यांनी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही महिन्यांपासून राजकीय हालचाली वाढवल्या होत्या. मात्र, बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेनंतर आणि आता जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
जामीन अर्ज फेटाळले
अर्थात या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाने ललित कोल्हे, सूत्रधार अकबर आणि हँड्लर आदिल या तिघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे कोल्हेंची निवडणुकीआधी सुटकाची शक्यता सध्या मावळली आहे.









