---Advertisement---
जळगाव : समाजमाध्यमांवरून ‘एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील,’ असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कु-हा दूरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी फेसबूक व इतर समाजमाध्यमांवरून आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केले होते.
या व्हिडीओमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. या आमिषाला बळी पडलेल्या देशातील विविध भागांतील नागरिकांना संबंधित भागात बोलावून त्यांना मारहाण करून रोख रक्कम व साहित्य लुटल्याचे प्रकार उघडकीस आले होते.
या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडीओंचा शोध सुरू केला. २५ डिसेंबर रोजी सकाळी फेसबूक प्रोफाइलवरून २८ सेकंदांचा एक व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले.
या व्हिडीओमध्ये ‘एक लाख का दस लाख मिलेगा, जिसे खरीदना है वही कॉल कीजिए’ असे आमिष दाखवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला असता, लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथील शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले आणि सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात क्रमांक ४२०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपींच्या ताब्यातून पाचशे रुपये असे लिहिलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.









