---Advertisement---
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद पोलीस ठाण्याचा पदभार ‘लेडी सिंघम’ योगिता नारखेडे यांनी नुकताच स्वीकारला. यावेळी त्यांचे
नशिराबादकरांकडून पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी स्वागत करण्यात आले.
नारखेडे यांनी २०२३ ते २०२४ या कालावधीत कसोदा (ता. एरंडोल) पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करत सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेणारी कार्यपद्धती रुजवली. त्यांच्या बदलीवेळी कसोदाकरांनी रथातून, बँडच्या तालावर आणि जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला. दरम्यान, याच ‘कसोदा पॅटर्न’ची अपेक्षा आता नशिराबादकरांकडून व्यक्त होत आहे.
तसेच अनुभवी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या API नारखेडे यांच्या नियुक्तीमुळे “आता कायद्याचा धाक राखत नागरिकांची मने जिंकणारी कार्यशैली येथेही पाहायला मिळेल,” अशी भावनाही नशिराबादकरांकडून व्यक्त होत आहे.
नवे पर्व, नवी आशा..
पोलीस व जनता यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करताना कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ देण्याची जबाबदारी आता API योगिता नारखेडे यांच्यावर आहे. त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले असून, नशिराबाद पोलीस ठाण्यात ‘स्त्रीशक्ती’चा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.







