मतदानाच्या एकदिवस आधीच शरद पवारांना मोठा झटका, ‘या’ निष्ठावंत नेत्याने साथ सोडली

---Advertisement---

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंगळवारी प्रचाराची मुदत संपल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले आहे. गुरुवारी महापालिकांसाठी मतदान होणार असून, त्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे प्रकार समोर आले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापले पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचे चित्र दिसले. याआधी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवार यांचे जुने सहकारी आणि माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

रमेश कदम हे शरद पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र अलीकडेच झालेल्या चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षात आपल्याला योग्य भूमिका आणि अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. याच कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर केला असल्याचे समजते.

विशेष म्हणजे रमेश कदम १९८४ पासून राष्ट्रवादी चळवळीशी जोडलेले होते. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती, मात्र त्या काळात रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती. त्यामुळे त्यांचा आताचा निर्णय पक्षासाठी अधिक धक्कादायक मानला जात आहे.

दरम्यान मंगळवारी निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली. आयोगाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांची घोषणा होताच रमेश कदम यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---