---Advertisement---
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजेंद्र गावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये या आधीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार फटका बसलेला असताना, मात्र आता ग्रामीण भागातही पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी आमदार राजेंद्र गावडे यांचा भाजप प्रवेश हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हा पक्षप्रवेश मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील काय म्हणाले…
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांवर देशभरात जनतेचा प्रचंड विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भाजपाला मोठा पाठिंबा मिळत आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जातो. राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे यांची भाजप प्रवेशामागची भूमिका….
बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे यांनीही भाजप प्रवेशामागची असलेली त्यांची भूमिका ही स्पष्ट केली. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबाने मोठे परिश्रम घेतले. मात्र पक्षाकडून नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली. भाजपचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान पाहून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.









