---Advertisement---
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली आर्थिक ताकद जागतिक स्तरावर सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने थेट 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारे महत्त्वपूर्ण करार केले असून, येत्या काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीचा मोठा पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी थेट चर्चा करत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असल्याचा विश्वास दिला.
दावोसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले….
“महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील.” ही केवळ घोषणा नसून, त्यामागे ठोस नियोजन आणि प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यात सध्या ‘तिसरी मुंबई’ म्हणजेच ‘नवी मुंबई’ आकार घेत असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडि-सिटीसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांमुळे आयटी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संशोधन, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे.
सद्यस्थितीत दहा ते बारा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांशी समन्वय सुरू असून, महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याचा सरकारचा निर्धार आहे. या गुंतवणुकीमुळे राज्याची आर्थिक गती वाढणार असून, तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचा मार्ग मोकळा होणार आहे.
एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याहून आलेली ही सकारात्मक व विकासात्मक बातमी महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे हे निश्चित.









