सकाळपासून ढगाळ वातावरण ; हलक्या पावसाचा तज्ज्ञांचा अंदाज…. बळीराजाच्या चिंतेत भर…!

---Advertisement---

 

राज्यात गेल्या काही दिवसापासून तापमान मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा कमी झालेला होता. मात्र रात्री आणि सकाळी गारवा जाणवत होता. दरम्यान दुपारच्या वेळी उकाड्याने नागरिक हे त्रस्त झालेले होते. आज जळगाव मध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे.

धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला असून या चारही जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीचा कडाका हा कमी होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात मंगळवारी तापमान स्थिर दिसून आले. कालच्या जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा विचार केला तर किमान तापमान 11.6 अंश आणि कमाल तापमान हे 28.6 अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान आज बुधवार ते येत्या रविवारपर्यंत किमान तापमान हे 12 ते 16 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान हे 30 ते 31 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडून आर्द्र हवा वाहू लागल्याने ढगाळ वातावरण हे तयार झालेले आहे. व सध्याची स्थिती पाहता 23 तारखेपासून पुन्हा धुक्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान आज सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून वातावरणात गारवा देखील जाणवत आहे मात्र हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने जळगाव जिल्ह्यातील बळीराजांची चिंता वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---