---Advertisement---
मुंबई : चिन्मय मिशनतर्फे मुंबईतील मुलुंड येथील बारकू पाटील उद्यानात शनिवारी सायंकाळी भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाचे भव्य ‘समष्टी गीता पठण’ आयोजित करण्यात आले. या आध्यात्मिक सोहळ्यात ५,००० हून अधिक भाविकांनी एकत्र येत सामूहिक गीता पठणाचा अनुभव घेतला. संपूर्ण परिसर भक्ती, चिंतन आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता. सन २०२६ मध्ये चिन्मय मिशन आपल्या ७५व्या वर्षात पदार्पण करत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे सामूहिक श्रद्धेचे आणि एकात्मतेचे भव्य दर्शन ठरले. पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांनी दिलेले भगवद्गीतेचे शाश्वत ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाला या कार्यक्रमातून नवसंजीवनी मिळाली.
या सोहळ्यात २५ शाळांमधील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. लहान वयातच तरुण पिढीला भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचा चिन्मय मिशनचा उद्देश या सहभागातून ठळकपणे दिसून आला. सायंकाळी कार्यक्रमास सुरुवात भक्तिगीतांनी झाली. चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. यावेळी पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. तसेच, लाईट अँड लेझर सादरीकरणाद्वारे गीतेतील गूढ तत्त्वज्ञान प्रभावी दृश्यरूपात मांडण्यात आले. मुख्य गीता पठणाचे नेतृत्व सुमारे ९० विद्यार्थ्यांनी केले. हे विद्यार्थी देशभरातील चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धांचे विजेते होते. त्यांच्या सहभागातून युवा पिढीत आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करण्याचे चिन्मय मिशनचे ध्येय अधोरेखित झाले.
भगवद्गीतेचा १५वा अध्याय ‘पुरुषोत्तम योग’ म्हणून ओळखला जातो. संसाराच्या क्षणभंगुरतेचे रूपक असलेला उलटा अश्वत्थ वृक्ष, विवेक आणि वैराग्याची आवश्यकता तसेच परमसत्य पुरुषोत्तमाचे स्वरूप या अध्यायात प्रभावीपणे मांडले आहे.
उपस्थितांना संबोधित करताना पूज्य स्वामी स्वरूपानंद म्हणाले….
“जेव्हा हजारो लोक एकत्र गीतेचे पठण करतात, तेव्हा ते केवळ शब्दोच्चार राहत नाही, तर एक सामूहिक अंतर्मुख अनुभव बनतो. पूज्य गुरुदेवांनी सुरू केलेली आध्यात्मिक क्रांती आपण आज पुढे नेत आहोत.”
मुंबईतील या समष्टी गीता पठण कार्यक्रमाने भगवद्गीतेची कालातीत शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित केली. वय, भाषा आणि पार्श्वभूमी यापलीकडे जाऊन गीता सर्वांना एका सूत्रात बांधते, हे या सोहळ्यातून स्पष्ट झाले. चिन्मय मिशनचा आध्यात्मिक वारसा हा केवळ जपण्यासाठी नाही, तर एकत्र येऊन जगण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आहे, याची प्रचिती या भव्य आयोजनातून आली.









