---Advertisement---
Dhule News : लक्झरीतून होणारी गुटखा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणली असून सुमारे आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच गुटखा तस्करी करणारी लक्झरीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
इंदूर येथून श्यामोली परिवहन कंपनीच्या वोल्वो लक्झरीतून (क्र. एमपी ४१ झेडजे ७४४४) पुणेकडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसालाची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अधिनस्त असलेले अधिकारी व अंमलदारांना सुचना देऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक-३ वर आर्वी पोलीस दूरक्षेत्र समोर नाकाबंदी करुन सापळा लावला. २० जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास लक्झरी इंदूरकडून मालेगावकडे येत असताना थांबविण्यात आली. पंचासमक्ष लक्झरीच्या डिक्कीची तपासणी व झडती घेतली असता त्यात वाहनांतील प्रवाश्यांच्या बॅगशेजारी असलेल्या पांढऱ्या गोण्या उघडून तपासणी केली असता त्यात राजश्री पानमसाला, रजनीगंधा पानमसाला व आरएमडी पानमसाल्यासोबत सुगंधीत तंबाखू, असा सुमारे आठ लाख १८ हजार ८५ रुपये किमतीचा प्रतिबंधीत पान मसालाचा साठा मिळून आला.
या प्रकरणी श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरुप सरकार (रा. इंदूर), शर्मा ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक कमल शर्मा (रा. इंदूर), पुणे येथील प्रवीण नावाचा व्यक्ती (पूर्ण नाव माहीत नाही) संबंधित वोल्वो लक्झरीचा चालक सचिन दिनेश बाडोले (वय ३१, रा. डी ३६५, आवासनगर, देवास, मध्य प्रदेश), बिरजूदास रतनदास बैरागी (४८, रा. इंदूर, मध्य प्रदेश), बसचा वाहक प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सूर्यवंशी (रा. इंदूर) या संशयितांविरुद्ध हवालदार चेतन कंखरे यांचे तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लक्झरीचा चालक सचिन दिनेश (रा. देवास, मध्य प्रदेश), बिरजूदास रतनदास बैरागी (रा. इंदूर, मध्य प्रदेश), बसचा वाहक प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सूर्यवंशी (रा. इंदूर) या तिघांना अटक करण्यात आली. उपनिरीक्षक छाया पाटील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पर्यवेक्षणात उपनिरीक्षक छाया पाटील, हवालदार गणेश शांताराम काळे, कुणाल पानपाटील, चेतन कंखरे, सुमित ठाकूर, पोलीस शिपाई विशाल पाटील, सुरेंद्र खांडेकर, नीलेश पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील यांच्या पथकाने केली.









