---Advertisement---
विश्वाने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली याचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. याशिवाय सर्वजण गर्वाने म्हणतात की आम्ही तंत्रज्ञानी आहोत. जगाने पावलोपावली प्रगती केली असली तरी सध्या सर्वत्र संपूर्ण विश्वाला अचंबित करणारा एआय अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. कहर म्हणजे या एआयने क्षणार्धात अनेक फोटो, व्हिडिओ तयार करून संभ्रमात टाकणाऱ्या स्थिती निर्माण केल्या आहेत. यातून मनुष्याला नेमके काय करावे आणि काय करू नये अशा द्विधा मनस्थितीत सापडला आहे.प्रत्येक वेळी तंत्रज्ञान जागतिक पातळीवर प्रगती करतांना आपण बघतोय आधुनिकतेत तंत्रज्ञानाचा वाढता आलेख निश्चितच सुखदायक आणि प्रेरणादायी आहे. संपूर्ण विश्वात धुमाकूळ माजविणाऱ्या एआय अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानीय अविष्काराने अलीकडच्या काळात प्रचंड हाहाकार माजवला आहे. विश्व क्षणोक्षणी तंत्रज्ञानात प्रगती करीत आहे याचा उपयोग प्रत्यक्ष सर्वत्र होतांना दिसतोय मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे अशा दोन्ही बाजू महत्त्वाच्या ठरताहेत. वर्तमानात एआय जितके लाभदायक आहे त्याच्या तुलनेत त्याचे दुष्परिणाम देखील अधिक वेगाने समोर येत येऊ लागलेत. याच एआयने बऱ्याच गोष्टी सुखकर केल्याचे आपण बघितले आहे. मात्र याने वन्य प्राणी बिबट्याला अधिकच प्रसिद्ध केल्याचीही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियाच्या तांत्रिक बाबींवर हे हास्यास्पद वाटत असले तरी ही बाब सामाजिक स्तरावर अधिक भयंकर होत चाललीये.
एआयच्या वापरामुळे बिबट्या झाला अधिकच फेमस :-
प्रत्येक १० जणांपैकी किमान ६ ते ७ जण सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून ते सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात मात्र याच सक्रियतेतून एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांकडून होतो आणि क्षणार्धात कोणतीही माहिती फोटो व्हिडिओ तंत्रज्ञानीय विश्वात वाऱ्याच्या वेगाने प्रसिद्ध होत आहेत. हा एआयचा धमाका जरी अफलातून वाटत असला तरी यातून अनेक घटना घडत आहेत. वन्य प्राणी बिबट्याचे दर्शन तसे दुर्मिळच आहे. मात्र अलीकडच्या काळात बिबट्या मानवी वस्तीत खुलेआम शिरून बालक, नागरिक शेतकरी,पहारेकरी, प्राणी इत्यादी घटकांवर हल्ला केल्याचेही घडले आहे. परंतु बुद्धिजीवी नागरिकांकडून या तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे इतके भन्नाट फोटो व व्हिडिओ बनवले जात आहे की जणू बिबट्या हा खेळण्याचे साधनच आहे. महाराष्ट्राच्या साक्री तालुक्यात तर या तंत्रज्ञानाने कहरच केला. सकाळी मुख्य महामार्ग लगत बिबट्याचे दर्शन झाल्याचा फोटो व्हायरल झाला. त्या फोटोमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी, वाहन चालक,शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले त्यानंतर काही वेळातच त्याच जागेवर सिंह व नंतर चक्क हत्ती त्या स्थानावर उभ्या असल्याचे व्हायरल फोटोतून दिसले. कोणीतरी नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळपणा केला असला तरी अवघ्या काही वेळातच तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली अनं वनविभागाला अखेर या व्हायरल फोटो बाबत असलेल्या अफवांचे खंडन करावे लागले.घटना खरी नसली तरी एआयच्या उपयोगातून बनवलेले बनावट फोटो हळव्या मनाच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण करणारे होते.विशेष म्हणजे फोटो व स्थान अगदी हुबेहूब दिसतात त्यामुळे दुर्लक्ष्य करणेही महागात पडू शकते. भविष्यात अशा खोडसाळपणामुळे खऱ्या घटनाही खोट्या वाटू लागतील म्हणून अशा समाजविघातक घटकांना वेळीच शोधून त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
निवडणुकीच्या प्रचारातही ‘एआय’ची धूम :-
निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप आणि आश्वासनांचा पाऊस आलाच असे समीकरण पूर्वीपासून चालत आलेले आहे.मात्र बदलत्या काळानुसार निवडणुकीचे वातावरण देखील ‘हायटेक’ होतांना दिसत आहे.नुकत्याच नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एआय किती भयानक पातळीवर जाऊन प्रचारासाठी सहाय्यभूत ठरू शकतो याचा अनुभूव विविध राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी घेतला आहे.अगदी खालच्या स्तरात जाऊन निवडणुकीच्या प्रचारासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवण्यात आले. विशेष बाब म्हणजे चेहऱ्यातील साधर्म्य अगदी मिळतेजुळते होते. यातून अनेकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर जणू गदा आल्याची स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा वापर करतांना किमान चहू बाजूचा विचार करून अशा गोष्टी करणे हीच योग्य कृती आणि समर्थनीय बाब एआय तंत्रज्ञानाच्या बाबतीत घडू शकेल.तर दुसरीकडे जेमिनी सारख्या पर्यायातून वेगवेगळे फोटो तयार केले जातात यातून वैयक्तिक सुरक्षिततेवर घाला घातला जातोय.
एआयचे फायदे अनं तोटेही ; वापर योग्य होणे काळाची गरज :-
आपल्या व्यवसायाची प्रचंड आकर्षक जाहिरात देखील आता एआयच्या माध्यमातून होऊ लागली आहे.कमीत कमी वेळेत या गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा वापरही वाढू लागला आहे. हा अतिशय चांगला उपयोग एआयच्या माध्यमातून सद्यस्थितीत बघावयास मिळत आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे.हाताला काम नसल्याने बेरोजगारांचीही संख्या वाढू लागली आहे.एआय ला मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटाची गरज असते. यामुळे वैयक्तिक माहितीची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. डेटा सुरक्षा हे मोठं आव्हान यातून बनलं आहे.एआय प्रणाली चुकीचा डेटा असल्यास चुकीचे निकाल देऊ शकतात. जर सदर प्रणाली महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये वापरली जात असेल तर ही बाब अतिशय धोकादायक ठरू शकते.एआय कडे सर्जनशील विचार करण्याची क्षमता नाही. हे तंत्रज्ञान केवळ प्रशिक्षित केलेल्या गोष्टीच करू शकते. प्रेरणा,नवे विचार, कल्पकता यासाठी मानवी बुद्धिमत्ताच आवश्यक.एआयचा गैरवापर करून हॅकर्स, सायबर गुन्हेगार फिशिंग, डीप फेक फोटो,व्हिडिओ तयार करून लोकांना ब्लॅकमेल करू शकतात.हा मोठा सायबर धोका बनू शकतो.एआय हे एक अद्भुत, पण तितकंच जबाबदारीने वापरण्याचं तंत्रज्ञान आहे. योग्य मार्गदर्शन, नियंत्रण आणि नैतिक वापराच्या चौकटीत राहून जर वापरकर्त्याने एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला, तर ते समाजाच्या प्रगतीचा एक अत्यंत शक्तिशाली आधार ठरू शकतो.
एकूणच तंत्रज्ञान विश्वात प्रगतीचा आलेख उंचावत अपेक्षित ध्येयपूर्ती होत असली तरी किमान या तंत्रज्ञानाचा अविष्कार योग्यरीत्या होणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच या तंत्रज्ञानाचा सदुपयोग झाल्याचे सार्थकी लागेल ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा विचारा वन्य प्राणी बिबट्या नाहक बदनाम होऊ नये हीच माफक अपेक्षा.
लेखक :-
श्री. विशाल रविंद्र बेनुस्कर
पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे









