शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच कॉपीचा घोटाळा; दहावीचा गणित पेपर शिक्षकांनीच सोडवला आणि विद्यार्थ्यांना वाटल्या कॉपी…..!

---Advertisement---

 

नाशिक जिल्ह्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेत चक्क शिक्षकांनीच पुढाकार घेऊन गणिताचा पेपर सोडवल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथील परीक्षा केंद्रावर घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या गणिताचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 21 मिनिटांत प्रश्नपत्रिकेचा फोटो मोबाईलवर काढून बाहेर पाठवण्यात आला. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका जवळच असलेल्या एका घरात पोहोचली.

या ठिकाणी काही शिक्षकांनी मिळून प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात केली. शिक्षकांनीच सर्व प्रश्नांची उत्तरे तयार केल्यानंतर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

यानंतर हरसूल येथून या उत्तरांच्या सुमारे 60 फोटोकॉपी तयार करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या फोटोकॉपी थेट परीक्षा केंद्राच्या आत नेऊन विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकारात परीक्षा केंद्रावरील काही पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनीही सहभाग घेतल्याची चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन करत हा कॉपीचा प्रकार अगदी उघडपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा सर्व प्रकार सुरू होता, त्या वेळी गटविकास अधिकाऱ्यांचे भरारी पथकही त्या परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी आले होते. मात्र पथक उपस्थित असतानाही कॉपीचा प्रकार सुरूच होता, असे सांगितले जात आहे.

काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक तर थेट परीक्षा हॉलमध्ये घुसल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाकांपर्यंत जाऊन त्यांना उत्तरे लिहून दिल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे स्वतः नाशिक जिल्ह्याचे असल्याने त्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी शिक्षक, केंद्रप्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---