---Advertisement---
इंडियन रेडक्रॉस सोसायटीला लागून असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेवरून बुधवारी मोठा वादंग निर्माण झाला. अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील यांच्यात थेट जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर मनपा प्रशासनाने ठोस भूमिका घेत या जागेवर जेसीबी फिरवून ती अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. आता या जागेवर मनपाने मालकीचा फलक लावला असून लवकरच तिथे कंपाउंड केले जाणार आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या इमारतीला लागूनच मनपाची मोकळी जागा आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेचा वापर सोसायटीकडून पार्किंगसाठी केला जात होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील यांनी मनपाकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीनंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला विश्वासात न घेता, जागेची पाहणी करून थेट रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर पियुष पाटील यांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त करत जाब विचारला.
याचदरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका अधिकाऱ्याने या जागेबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असून, ही जागा पार्किंगसाठी सोडावी, अशी मागणी मनपा अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, पियुष पाटील आणि मनपाचे अभियंता प्रसाद पुराणिक यांनी हे दावे फेटाळून लावत, या जागेवर कोणताही न्यायालयीन वाद नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना जागेच्या गेटला कुलूप लावा, बंद करा ती जागा असे म्हटले. यावर पियुष पाटील यांनी आक्षेप घेत ही जागा मनपाची आहे म्हटल्यावर डॉ. ठाकूर आणि पाटील यांच्यात जोरदार तू तू-मैं मैं झाली.
वादाला वैद्यकीय तोंड फुटल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रशासनाने नमती भूमिका घेतली. आम्हाला तुमची जागा नको, केवळ पार्किंगसाठी वापरू द्या, त्यासाठी आम्ही आयुक्तांना रीतसर पत्र देतो अशी विनवणी त्यांच्याकडून करण्यात आली. या सर्व वादानंतर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने जागेचे सपाटीकरण केले आणि ती जागा ताब्यात घेतली. या जागेवर आता मनपाने स्वतःच्या मालकीचा फलक लावला असून, अतिक्रमणापासून बचाव करण्यासाठी लवकरच या जागेला कंपाउंड केले जाणार आहे.
या सर्व गोंधळात शासकीय यंत्रणांचा मनमानी कारभारही चव्हाट्यावर आला आहे. ही जागा महानगरपालिकेची मालकीची असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या जागेत परस्पर संरक्षण भिंत बांधत्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या अनधिकृत भिंतीबाबत मनपा काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे.









