शरद पवार गटाला आणखी धक्का बसणार? माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

---Advertisement---

 

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासाठी आणखी एक धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हालचालींमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्येही चर्चांना वेग आला आहे.

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी शिंगणे प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. मात्र, जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतःही जिल्हा बँकेशी संबंधित प्रश्न आणि मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

तथापि, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे केवळ बुलढाणा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

सध्या तरी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून शिंगणे यांच्या पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, मुख्यमंत्री आणि शिंगणे यांची प्रस्तावित भेट झाल्यानंतरच या चर्चांवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---