वाडी येथे वीज कोसळून पंचर व मोटार सर्व्हिस सेंटरला आग; ७ ते ८ लाखांचे नुकसान….!

---Advertisement---

 

शिंदखेडा तालुक्यातील वाडी येथे विजांच्या कडकडाटानंतर लागलेल्या आगीत पंचर व मोटार सर्व्हिस सेंटरमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गावाच्या चौकात चतूर गांगजी गिरासे यांचे ‘पेडकाई माता पंचर हार्डवेअर अँड मोटार सर्व्हिस सेंटर’ हे दुकान आहे. राहत्या घरालगतच हे दुकान असल्याने गिरासे कुटुंब तेथेच वास्तव्यास आहे.

दि. २३ जून रोजी परिसरात विजांचा कडकडाट सुरू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून कुटुंबीय झोपले होते. मात्र रात्री अंदाजे दहा ते साडेदहाच्या दरम्यान दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर घरातील सदस्य जागे झाले.

दुकानाच्या आतील भागात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले. त्यानंतर दुकानाचे शटर उघडण्यात आले असता आगीने संपूर्ण दुकानाला विळखा घातल्याचे दिसून आले. काही वेळातच दुकानातील बहुतांश साहित्य आगीत भस्मसात झाले.

या आगीत मोठे कॉम्प्रेसर मशीन, एमआरएफ कंपनीचे टायर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, पंचर काढण्यासाठी लागणारे साहित्य तसेच काही रोख रक्कम जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. विजांच्या धक्क्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून संबंधित यंत्रणांकडून घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.

आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याने जीवितहानी टळली. या घटनेमुळे वाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---