वादळी वाऱ्याने केळी पिकांचे नुकसान; विमा भरपाई नाकारल्याने मुक्ताईनगर-रावेरमधील शेतकरी आक्रमक…!

---Advertisement---

 

मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसल्याने संताप वाढत आहे.

परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमा कंपन्यांनी हवामान केंद्राच्या नोंदींचा आधार घेत वादळी वाऱ्याची अधिकृत नोंद नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे नामंजूर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर आणि रावेर तालुका हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. जूनच्या सुरुवातीला झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर विविध लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.

मात्र आता हवामान यंत्रात वादळी वाऱ्याची नोंदच नसल्याचे कारण देऊन विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई नाकारल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हवामान यंत्रात तांत्रिक बिघाड किंवा नोंदणीतील त्रुटी असल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना का बसावा, असा प्रश्न केळी उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्ष पाहणी अहवाल, पंचनामे आणि प्रशासनाच्या नोंदींमध्ये नुकसान स्पष्ट दिसत असताना केवळ हवामान यंत्राच्या नोंदीचा आधार घेऊन मदत नाकारणे अन्यायकारक आहे. राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, विमा कंपन्या शासनाच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नुकसान भरपाईबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---