---Advertisement---
आषाढीवारी २०२६ निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्या पालखीसाठी महाराष्ट्र शासनाने ₹२२ लाख ८१ हजार ४८५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पालखीसोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ग्रामविकास विभागाने २३ जून २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून हा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून पालखीच्या मुक्कामस्थळी भाडेतत्त्वावर फिरती शौचालये, स्नानगृहे तसेच टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षी श्री सद्गुरू सखाराम महाराजांच्या पालखीसोबत हजारो वारकरी पायी वारीत सहभागी होत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. शासनाच्या या निर्णयामुळे वारीदरम्यान स्वच्छता, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची अधिक चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने वारकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी यंदा आषाढीवारीसाठी एकूण ₹२ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीसाठी सर्वाधिक ₹२ कोटी ८ लाख ९३ हजार ९५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान पालखीसाठी ₹४१ लाख ६ हजार ४९५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शासनाने मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात १० टक्के निधी जिल्हा परिषद जळगावकडे वर्ग केला असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे पालखी मार्गावरील मुक्कामस्थळी सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आषाढीवारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने केलेल्या या आर्थिक तरतुदीचे वारकरी, भाविक आणि पालखी सोहळ्याशी संबंधित संस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.









