---Advertisement---
पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द गावात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गावातील उघड्या गटारी, साचलेले सांडपाणी आणि बंद पडलेली सार्वजनिक शौचालये यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गावातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत वस्ती भागांमध्ये गटारी उघड्या अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द गावातील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे संबंधित विभागांकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, गावात मंजूर करण्यात आलेल्या १० शौचालय युनिटपैकी केवळ २ युनिट कार्यरत असून उर्वरित युनिट देखभाल व दुरुस्तीअभावी बंद आहेत. यामुळे विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावातील महिलांनी आणि नागरिकांनी या प्रश्नावर आवाज उठवत तात्काळ स्वच्छता मोहीम राबविणे, उघड्या गटाऱ्यांची दुरुस्ती करणे तसेच बंद पडलेली शौचालये सुरू करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शामराव पाटील यांनीही प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“गावातील उघड्या गटारी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. बंद असलेली शौचालये त्वरित सुरू करावीत आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे मुरलीधर पाटील यांनी सांगितले.









