---Advertisement---
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल मूर्तीवर मंदिर समिती व पुरातत्त्व विभागाच्या वतीने २३ आणि २४ जून रोजी करण्यात येणाऱ्या प्रस्तावित रासायनिक वज्रलेपनाच्या कामाला पंढरपूर येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वज्रलेपनाच्या विषयावर सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले असून भाविक आणि वारकरी संप्रदायाचे लक्ष आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले आहे.महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम लंके आणि बाळकृष्ण डिंगरे यांनी रासायनिक वज्रलेपनाला विरोध दर्शवत पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सुधीर रानडे यांनी न्यायालयात सविस्तर बाजू मांडत रासायनिक लेपनामुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपावर तसेच तिच्या पवित्रतेवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद केला. याचिकाकर्त्यांनी धर्मशास्त्राचा दाखला देत न्यायालयासमोर मांडले की, देवतांची मूर्ती ही केवळ दगडी अथवा पाषाणशिल्प नसून त्यामध्ये साक्षात देवत्व वास करत असते. त्यामुळे मूर्तीवर कृत्रिम आणि रासायनिक पदार्थांचा वापर करणे धार्मिक परंपरा आणि शास्त्रांच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला. मंदिर समिती मूर्तीकडे केवळ दगडी शिल्प म्हणून पाहत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आक्षेपही याचिकेत नोंदविण्यात आला.
रासायनिक लेपनामुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊ शकते आणि त्यामुळे मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही न्यायालयात नमूद करण्यात आले. यापूर्वी चार वेळा रासायनिक लेपन करण्यात आले होते; मात्र त्याचे अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने त्या पद्धतीचा फोलपणा सिद्ध झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. त्याऐवजी आयुर्वेदिक पद्धतीने केले जाणारे पारंपरिक वज्रलेपन हे अधिक सुरक्षित, शास्त्रसंगत आणि परंपरेशी सुसंगत असल्याचे पुराव्यांसह न्यायालयासमोर मांडण्यात आले.
दरम्यान, दिवाणी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपिलावर तातडीने सुनावणी होणार असून रासायनिक वज्रलेपनाच्या भवितव्याबाबत आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रस्तावित वज्रलेपनाचे काम सध्या थांबले असले तरी मंदिर समितीने भाविकांना दिलासा देताना २३ आणि २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
विठ्ठल भक्त, वारकरी संप्रदाय, मंदिर प्रशासन आणि पुरातत्त्व तज्ज्ञ यांच्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणावर आज वरिष्ठ न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, त्यातून पुढील दिशा निश्चित होणार आहे.









