तळोद्यात बोरवण नदीला पूर १० गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प झाल्याने नागरिक अडचणीत….!

---Advertisement---

 

तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील बोरवण नदी दुथडी भरून वाहत असून नदीला आलेल्या पुरामुळे बोरवणसह परिसरातील आठ ते दहा लहान-मोठ्या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंवरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बोरवण नदीवरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी त्याची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे. हा पूल परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने पूरस्थितीत नागरिकांचे हाल होत आहेत.

अपूर्ण पुलामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची वाहतूक तसेच रुग्णांच्या उपचारासाठी होणारी ने-आण यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आता पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

या प्रकरणावर आमदार राजेश पाडवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सुमारे ७० वर्षांनंतर या नदीवर पुलाचे काम सुरू झाले आहे. कामादरम्यान वनविभागाच्या काही अडचणी होत्या. तसेच काही संघटनांनीही या पुलाच्या कामास विरोध केला होता. मात्र मंजूर अंदाजपत्रकानुसार अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला असून येत्या एका महिन्यात पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येईल.

दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने रखडलेल्या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---