---Advertisement---
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. ललिता पाटील, उपजिल्हाप्रमुख सौ. वंदनाताई पाटील, सौ. मंदाताई पाटील, उपजिल्हा समन्वयक सौ. बेबाताई पाटील, उपजिल्हा संघटक जयश्री येवले, शहर प्रमुख सौ. मंदाकिनी पारोचे, सौ. अनिता पाटील, नगरसेविका सौ. वर्षाताई ब्राह्मणे आणि सौ. मनीषाताई बाविस्कर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करून जलद न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात लागू होणाऱ्या कायद्यांबाबतही माहिती देण्यात आली. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६५(२) नुसार १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास किमान २० वर्षे सश्रम कारावास, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम १०३ अंतर्गत खुनासाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद आहे.
याशिवाय POCSO कायदा २०१२ मधील कलम ६ नुसार लहान मुलांवरील गंभीर लैंगिक अत्याचारासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. २०१९ मधील दुरुस्तीनंतर १२ वर्षांखालील मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात थेट फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
महिला आघाडीच्या वतीने या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच खटला विशेष न्यायालयात चालवून ६० दिवसांत निकाल द्यावा, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पुनर्वसन द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.









