---Advertisement---
आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट घराघरातील खर्चावर दिसू लागला आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलांच्या आयातीत अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमी झाल्यामुळे जळगावसह राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये या तेलांच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे.
दरवाढीचा फटका केवळ खाद्यतेलांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम इतर दैनंदिन वस्तूंवरही होत आहे. परिणामी घरगुती खर्चाचा ताळमेळ राखणे गृहिणींसाठी अधिक कठीण झाले आहे.
भारतामध्ये खाद्यतेलांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र देशांतर्गत उत्पादन पुरेसे नसल्याने आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात कमी झाली असून त्यामुळेच किमतींमध्ये वाढ झाली आहे. मात्र शेंगदाणा तेलाच्या दरांमध्ये तुलनेने स्थिरता दिसून येत आहे.
मार्चच्या सुरुवातीला जे दर होते, त्याच्या तुलनेत सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या दोन्ही तेलांचा मोठा पुरवठा परदेशातून होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत त्यांची आवक कमी पडत आहे, आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर होत आहे.
जुने दर आताचे दर
शेंगदाणा तेल – १६० ते १८० – १९० ते २२०
सोयाबीन तेल – १३० ते १३५ – १५० ते १७०
तीळ तेल – २३० ते २४० – २६५ ते २७०
सूर्यफूल तेल – १३५ ते १५० – १७० ते १९०









