भोंदूबाबा खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करा; रुपाली ठोंबरे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

---Advertisement---

 

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नव्या घडामोडींना वेग आला असून, या प्रकरणात सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. झाशीच्या राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी नाशिक येथे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच खरात प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप खरातच्या संपर्कातील कोणत्याही राजकीय व्यक्तीला अटक किंवा चौकशीसाठी बोलावण्यात आले नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती सोशल मीडियावर समोर येत असताना, या प्रकरणात चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी होऊन संबंधित चित्रफिती समोर आणाव्यात.


ठोंबरे यांनी पुढे आरोप केला की, खरात प्रकरणात इतरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी चाकणकरांकडून दबाव टाकण्यात आला होता. राज्य महिला आयोगाकडे तक्रार घेऊन जाणाऱ्या महिलांची भेट चाकणकर घेत असत आणि त्यांच्या समस्या ऐकून त्यांना “ग्रह-तारे, पत्रिका पाहिली का?” असे विचारत खरातकडे पाठवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.


खरातला अटक झाल्यानंतर अनेक पीडित महिलांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधला असून, त्यांनी झालेल्या अत्याचारांची माहिती दिल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात चाकणकर दलाल म्हणून काम करत असून, ही साखळी त्यांच्या माध्यमातून चालवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


दरम्यान, या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत असून, महसूल विभागातील काही अधिकारीही खरातच्या संपर्कात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले होते, तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काही अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे मान्य केले आहे.


या पार्श्वभूमीवर, भोंदूबाबा खरात प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---