दारू पिण्याच्या कारणावरून वाद, तरुणावर धारदार कटरने वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल….!

---Advertisement---

 

चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावात दारू पिण्याच्या वेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. या वादातून एका तरुणावर धारदार कटरने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण संभाजी बागुल (वय २७, रा. तरवाडे पेठ) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ११ जून रोजी रात्री गावातील एका मोकळ्या जागेत काही जण एकत्र बसून दारू पित होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर वातावरण तापले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

फिर्यादीनुसार, वादानंतर एका आरोपीने धारदार कटर काढून किरण बागुल यांच्यावर हल्ला केला. कटर हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातालाही दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने पाठीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी मध्यस्थी करत भांडण सोडविल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर जखमी अवस्थेत घरी परतलेल्या किरण बागुल यांनी संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांसह संबंधितांकडे जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा वाद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जखमी किरण बागुल यांना सुरुवातीला चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जलाराम कोळी, माधव कोळी आणि गणेश बापू कोळी (सर्व रा. तरवाडे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---