चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपींना अटक….!

---Advertisement---

 

चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेत महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच अन्य एक दुचाकी असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात १४ जून २०२६ रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार चाळीसगावातील हनुमानसिंग नगर परिसरातील राहुल सुभाष भिसे याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरल्याची माहिती समोर आली.

माहितीची पडताळणी करून राहुल भिसे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. पुढील चौकशीत त्याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, संबंधित मोटारसायकल २० हजार रुपयांत खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर ते नंतर देण्याचे सांगत राहुल भिसे टाळाटाळ करीत असल्याचेही तपासात समोर आले.

या कारवाईत दोन्ही आरोपींकडून एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींसह मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

स्वतंत्र कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन फिरणारा एक संशयित आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. मात्र वाहनाबाबत समाधानकारक माहिती देण्यात तो अपयशी ठरला.

याप्रकरणी संशयित इसमासह सुमारे २५ हजार रुपये किंमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आणि भूषण पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---