पहिले लग्न लपवून दुसरा विवाह; अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार उघड, एसआरपी जवानाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा…!

---Advertisement---

 

पहिले लग्न झाल्याची माहिती लपवून एका महिलेशी विवाह केल्याचा आणि तिच्याकडून लाखो रुपये तसेच सोन्याचे दागिने घेत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपी) एका जवानावर करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जून २०२२ मध्ये तिचा विवाह विनोद भटू सोनवणे याच्याशी झाला होता. आरोपीने स्वतःला शासकीय सेवेत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला होता. विवाहानंतर दोघे काही काळ अमळनेर येथील मुंदडा नगर परिसरात राहत होते.

आरोपीने विविध कारणे सांगत महिलेकडून आर्थिक मदत घेतली. बुलेट मोटारसायकल खरेदीसाठी जवळपास ९८ हजार रुपये घेतल्यानंतर तिच्या नावावर शेती खरेदी करून देण्याचे आश्वासन देत सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रक्कमही स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही शेती खरेदी न करता आरोपीने वेळकाढूपणा केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

महिलेने पैसे आणि दागिने परत मागितल्यानंतर आरोपीकडून मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच विविध कारणे देत दरमहा आर्थिक मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, या प्रकरणाला नाट्यमय वळण मे २०२६ मध्ये आले. शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल असताना रुग्ण नोंदणीदरम्यान आरोपीने तिचे नाव बदलून दुसऱ्याच महिलेचे नाव नोंदविल्याचे समोर आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने ते नाव आपल्या पहिल्या पत्नीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपीचे यापूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती समोर आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती पोलीस अधिकारी नसून राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत जवान असल्याची माहिती समोर आली आहे. तो सध्या काश्मीर येथे कार्यरत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि अन्य बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---