भीमाशंकर दर्शनासाठी मोठा दिलासा; ऑनलाईन बुकिंगशिवायही घेता येणार दर्शन, सकाळी ७ ते ११ या वेळेत सर्व भाविकांना थेट प्रवेश….!

---Advertisement---

 

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने ऑनलाईन पास बुकिंगची सक्ती काही प्रमाणात शिथिल करत सकाळी ७ ते ११ या वेळेत सर्व भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन पास बुकिंग व्यवस्था सुरू केली होती. मात्र, वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांना पास मिळण्यात होणारा त्रास यामुळे अनेक तक्रारी समोर येत होत्या.

पास उपलब्ध नसल्यामुळे अनेक भाविकांना दर्शन न घेताच परत जावे लागत असल्याने नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या कालावधीत येणाऱ्या सर्व भाविकांना कोणत्याही ऑनलाईन बुकिंगशिवाय थेट दर्शनाची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे.

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू होते. याअंतर्गत नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.

देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारीपासून मंदिर परिसरातील कामांसाठी काही निर्बंध लागू केले होते. सामान्यतः सुमारे एका वर्षाचा कालावधी लागणारे हे भव्य काम स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि संस्थानच्या सहकार्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात यश आले.

नवीन सभामंडप तयार झाल्याने आणि ऑनलाईन पासची सक्ती काही तासांसाठी शिथिल करण्यात आल्याने देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी भीमाशंकर दर्शन अधिक सुलभ आणि सोयीचे होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---