---Advertisement---
Dhule Crime : शहरातील साक्री रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोनमाळ दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने ओढून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ज्योती रमेश धनगर (वय ४१, रा. सोनकुळी अपार्टमेंट, साक्री रोड, धुळे या ५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मावशी लताबाई दिलीप परदेशी यांच्यासोबत आशीर्वाद हॉस्पिटलसमोरील रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. यावेळी मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम येवून त्यांनी या महिलांजवळ दुचाकी उभी केली. महिलांना काही समजण्याच्या आतच, पाठीमागे बसलेल्या चोरट्याने ज्योती धनगर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढले आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पळ काढला.
ओढून नेलेले मंगळसूत्र ३७ हजार ५०० रुपयांचे होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा र.नं. १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचा शोध
शहरात चोरीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत.









