पोलीस दलात खळबळ….पोलिस कोठडीतील हत्या प्रकरण; पोलीस दलातील 9 जणांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर…!

---Advertisement---

 

तामिळनाडूतील गाजलेल्या सथानकुलम पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाचा मोठा आणि ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तमिळनाडू पोलीस दलातील ९ जणांना दोषी ठरवलं असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल अत्यंत दुर्मीळ असल्याचं न्यायालयाने नमूद करत, पोलिसांकडून झालेला हा गुन्हा अत्यंत निघृण आणि सत्तेच्या दुरुपयोगाचं उदाहरण असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलम येथे व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना दुकान उघडे ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र पोलीस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली. संपूर्ण रात्र चाललेल्या या छळामुळे दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आणि काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठू लागला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे होता, मात्र प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाच्या निर्देशानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पोलीस स्टेशनमध्ये रक्ताचे डाग आढळणे, एका महिला कॉन्स्टेबलची महत्त्वपूर्ण साक्ष, तसेच आरोपींनी केलेल्या छळाचे पुरावे यामुळे हा गुन्हा स्पष्ट झाला. तब्बल सहा वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह एकूण ९ पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयाने हा गुन्हा पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर असल्याचं नमूद करत सर्व आरोपींना कठोर शिक्षा सुनावली. एकाच वेळी इतक्या पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे. या निकालामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, न्यायव्यवस्थेने दिलेला हा संदेश स्पष्ट आहे, कायद्याचे रक्षक जर गुन्हेगार ठरले, तर त्यांनाही कायद्याच्या कठोर चौकटीतच शिक्षा होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---